जायखेडा : अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे कांदा रोपावर थ्रिप्स व करपा रोगाच्या प्रादुर्भावाची दिसत असलेली लक्षणे.  (छाया : प्रकाश शेवाळे)
नाशिक

Nashik Unseasonal Rain | गहू, हरभरा, मका, कांदा, कोबीसह अन्य पिकांचे नुकसान

जायखेडा परिसरात पिकांना ढगाळ हवामानाचा फटका; कांदा उत्पादकांना धास्ती

पुढारी वृत्तसेवा

जायखेडा (नाशिक) : राब-राब राबून शेतकर्‍यांनी कांदा पिकविला. तो विक्री करण्यास गेले, तर कांद्याचे दर आधीच कमी. त्यातच जायखेडासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. या वातावरणामुळे गहू, हरभरा, मका, कोबीसह अन्य पिकांवर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

शुक्रवारी (दि.27) व शनिवारी (दि.28) पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. बागलाण तालुक्यातील सर्वच बाजार समित्यांचे प्रांगण सध्या कांद्याच्या गोण्या, ट्रॅक्टर टेम्पोने फुल्ल झाले आहेत. कांद्याचे दर कोसळले आहेत. आवक वाढतच आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने, कर्ज काढून खते, औषधांवर खर्च केला. सध्याच्या दरातून खर्च तरी निघेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जायखेडासह परिसरात काही प्रमाणात उन्हाळ कांदालागवडीस सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी कांदालागवड पूर्ण झाली आहे. 70 ते 80 टक्के कांदालागवड ही जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशातच उन्हाळ कांदालागवड झालेल्या शेतकर्‍यांना व ज्यांची लागवड झालेली नाही, अशा शेतकर्‍यांच्या शेतातील कांदा रोपांना पावसाचा व बदलत्या हवामानाचा फटका बसून लागवड किती प्रमाणात, होते की नाही? अशा शंका आहेत. असेच वातावरण पुढील काही दिवस टिकून राहिल्यास शेतकर्‍यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होतो की काय? असे चित्र या बदलत्या वातावरणामुळे निर्माण झालेले आहे

पाऊस, ढगाळ हवामान व धुक्यामुळे फळबागांसह इतर पिकांनाही फटका बसणार आहे. डाऊनी, भुरी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे औषध फवारण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जर अवकाळी पाऊस पुढेही पडत राहिला, तर शेतकर्‍यांना खूप मोठा फटका बसणार आहे.
शरद शेवाळे, शेतकरी, जायखेडा, नाशिक
गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. त्यामुळे विविध पिकांवर बुरशीजन्य रोग पडून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी बुरशीजन्य रोगांसह कीड शोषणारी अळी, चिकटा यांचा बंदोबस्त करावा.
किरणकुमार शिंदे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, बागलाण, नाशिक
ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम होतो. पाऊस, गारपीट झाल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होते. पिकांवर रोग पडतो. यासाठी शेतकर्‍यांनी आवश्यक औषधांची मात्रा वापरून फवारणी करावी. तसेच संबंधित कृषी अधिकारी, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे.
देवीदास सोनवणे, कृषी तज्ज्ञ, बागलाण, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT