Nashik UBT 
नाशिक

Nashik | नगरसेवकफुटीचे 'उबाठा'कडून खंडन

Nashik UBT- केशव पोरजे : सर्व पंधरा नगरसेवक ठाकरे गटासोबतच असल्याचा केला दावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील १५ पैकी १२ नगरसेवक शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अफवाच असल्याचे ठासून सांगत सर्व १५ नगरसेवक पक्षासोबत उभे असल्याचा दावा गटनेते केशव पोरजे यांनी शुक्रवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला. शिंदे गटाकडून आमिषे, दबाव आणि अफांचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Nashik, UBT, Corporator Defection, Shiv Sena UBT, Nashik Politics, Maharashtra Politics,

दाव्यादाखल १५ पैकी १३ नगरसेवक पोरजे यांनी माध्यमांसमोर आणत फुटीच्या चर्चेचे खंडन केले. यावेळी पक्षाचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश गिते यांच्यासह योगेश भोर, वैशाली दळवी, माधुरी ढेमसे, रुचिरा साळवे, वैशाली दाणी, योगेश गाडेकर, शैलेश ढगे, भारती ताजनपुरे, संजीवनी हांडोरे, प्रमिला मैंद आणि सीमा पवार हे नगरसेवक उपस्थित होते. कौटुंबिक कारणामुळे मुरलीधर भामरे व मंगला आढाव अनुपस्थित होते. मात्र, भामरे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव तेजस भामरे उपस्थित राहिले.

यावेळी पोरजे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप करत पोरजे म्हणाले, जाणीवपूर्वक विकासकामे रखडवली जात आहेत. अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नाही. नगरसेवकांना त्रास देऊन पक्षांतरासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. नगरसेविका सीमा पवार यांनी शहरातील पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, कुंभमेळ्याच्या कामांवरील टीका आणि गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावरून सरकारवर होत असलेली टीका झाकण्यासाठीच नगरसेवक फुटीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला.

राममंदिरातील चोरीच्या घटनेवरूनही जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा चर्चा रंगवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारती ताजनपुरे यांनी एका वकिलामार्फत नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. योगेश गाडेकर यांनीही निवडणुकीत विविध राजकीय डावपेचांना तोंड देत जनतेने ठाकरे गटाला साथ दिल्याचे सांगितले. त्यामुळे कोणताही नगरसेवक पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उबाठात अस्वस्थता, काहीही घडू शकते!

शिवसेने (शिंदे गटा) चे नेते अजय बोरस्ते यांनी उबाठा नेत्यांवर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, पोरजे यांचे आरोप हास्यास्पद आहेत, यातून त्यांच्या पक्षातील अस्वस्थता समोर येत आहे. आमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. कोण एजंट आहे, कोण आमची वकिली करतो हे आम्हालाही कळू द्या, आम्ही शोध घेऊ. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या कामांकडे बघून कोणीही आले तर सांगता येत नाही. आमच्यावर आरोप करून त्यांची अस्वस्थता बाहेर येत आहे. राज्यभरात प्रवेश होत आहे, त्यात नाशिकमध्ये काही प्रवेश झाले तर आश्चर्य वाटायला नको. उबाठाच्या लोकांनी गोकुळ गिते यांना मतदान केले, आता त्यांच्या माध्यमातून काही झाले तर माहिती नाही. एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यांच्याकडे घोडेबाजार चालत नाहीत. गोकुळ गिते यांनी यांना उबाठाने मतदान केले ते आता शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, त्यामुळे 'कुछ भी हो सकता है.'

ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि चिन्हावर निवडून आलो आहोत. पक्ष सोडणाऱ्याचे सदस्यत्व रद्द होईल.

- प्रथमेश गिते, महानगरप्रमुख तथा नगरसेवक, उबाठा

शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवून नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिषे दाखवली जात असून, १० नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे.

- केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (उबाठा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT