पंचवटी: चामर लेणी येथे अडकलेल्या युवकांना बाहेर काढल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे व अग्निशामक दलाचे कर्मचारी.  (छाया : गणेश बोडके)
नाशिक

Nashik | चामरलेणीवर अडकलेल्या दोन युवकांची सुखरूप सुटका

Chamar Leni caves । अग्निशामक दल, म्हसरूळ पोलिसांकडून बचाव मोहिम

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक): चामर लेणीच्या टेकडीवर अडकलेल्या दोन युवकांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशामक दल व म्हसरूळ पोलिसांना यश मिळाले आहे. दोन ते अडीच तासांच्या बचाव मोहिमेत पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी या दोन युवकांची सुटका केली.

साहिल टिळे व मित्र ओम यादव (रा. उपनगर) हे दोघे शनिवारी (दि.१९) ट्रेकिंगसाठी चामर लेणी येथे सकाळी दाखल झाले. बरच अंतर वर गेल्यानंतर ते रस्ता भरकटले आणि घाबरलेल्या दोघांनाही सकाळी नऊच्या सुमारास म्हसरूळ पोलिसांना व अग्निशामक दलाला फोन करून आम्ही चामरलेणी येथे अडकलो असल्याची माहिती दिली. तसेच आम्ही टेकडीवरील सपाट भागावर आहे, माझा हात सटकू शकतो, आम्हाला वाचवा... अशी माहिती देताच काही मिनिटातच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संजय चिखले व पोलिस अंमलदार नितीन पारधे आणि अग्निशामक दलाचे पंचवटी अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायरमन संजय कानडे, फायरमन बाळासाहेब लहांगे, वाहन चालक प्रकाश मोहिते, शिकाऊ फायरमन प्रणय बनकर, ऋषिकेश जाधव, सिद्धांत गोतीस हे घटनास्थळी बंब घेऊन पोहचले. सोबत मदतीला वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगावकर होते. दलाने रेस्क्यूचे साहित्य, दोर घेऊन चामर लेणीच्या पायऱ्या व कच्च्या रस्त्याने डोंगराची चढाई केली.

डोंगरावरील तीव्र उतारावर अडकलेले दोन युवक पथकाला दिसले. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी खालून रस्ता नव्हता. दुसऱ्या रस्त्याने डोंगराच्या माथ्यावर जाऊन मोठा दोरखंड डोंगराच्या मोठ्या खडकाला बांधून अडकलेल्या मुलांकडे फेकला. प्रथम साहिलची आणि नंतर ओमला दोराच्या सहाय्याने वर काढले. त्यांना खाली बसवून पिण्यासाठी पाणी देऊन धीर दिला. नंतर त्यांना डोंगराच्या कच्च्या रस्त्याने खाली पोलिस चौकीपर्यंत आणले व पोलिस चौकीमध्ये त्यांच्या नावांची नोंद अंमलदार गणेश नागरे यांनी करुन घेतली. त्यानंतर त्या मुलांना म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार नितिन पारधे यांच्या ताब्यात दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT