नाशिक : सतीश डोंगरे
उद्योगांसाठी आवश्यक ती सुबत्ता असतानाही, नाशिक उद्योगांबाबत उपेक्षित आहे. परिणामी मागील 20 वर्षांपासून नाशिककर अजूनही मोठ्या प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिककरांची आणि उद्योगांची ही गरज लक्षात घेऊन वर्षभरात नाशिकमध्ये किमान दोन मेगा प्रकल्प आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच उद्योग वाढावा, रोजगार उपलब्ध या धोरणानुसार स्थानिक उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी 'मागेल त्याला भूखंड' उपलब्ध करून देण्यासाठी आपण अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत प्रयत्नशील असू, असा निर्धार नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला. 'दै. पुढारी' कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेली मते...
अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपला मुख्य अजेंडा काय असेल?
मुंबई, पुणे, नाशिक हा सुवर्णकोण लक्षात घेतल्यास मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिक औद्योगिक विकासासाठी आजही प्रयत्नशील आहेत. तुलनेत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी गुंतवणूक जात आहे. महाराष्ट्रातील उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या दावोस दौऱ्यातही नाशिकच्या पदरी निराशाच पडत आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या माझ्या कारकिर्दीत अधिकाधिक गुंतवणूक नाशिकला आणण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. 'इज ऑफ डुइंग बिझनेस' यासाठी नाशिकला प्रमोट करणार आहे. आगामी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये नाशिकला मोठ्या घोषणेची अपेक्षा असून, त्यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करणार आहोत. याशिवाय पुढील दावोस दौऱ्यात निमाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा. जेणेकरून नाशिकची बलस्थाने त्याठिकाणी मांडली जातील, यासाठीही मी प्रयत्नशील असेल.
राजकीय 'पॉवर' कमी पडत असल्याने, नाशिक उद्योगात मागे असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय?
नाशिकचा औद्योगिक विकास साध्य करायचा असेल, तर सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. जिल्ह्याला दमदार लोकप्रतिनिधी लाभले आहेत. तीन मंत्री आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही नाशिकबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. या सर्वांना सोबत घेऊन नाशिकचा औद्योगिक विकास साध्य करायचा आहे. आतापर्यंत काय घडले, याचा विचार न करता, पुढे काय चांगले करता येईल हे समोर ठेवून वाटचाल केल्यास नक्कीच फलित मिळेल.
उद्योजकांना त्रास देणाऱ्यांचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येत आहे, नाशिकमध्ये तशी स्थिती आहे काय?
उद्योगासाठी नाशिकमध्ये सर्वार्थाने पोषक वातावरण आहे. औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यंतरी घेण्यात आलेल्या बैठकीत कामगार संघटनांच्या नेतेदेखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने उद्योजकांना मोठे बळ मिळाले आहे. काही मंडळी अधूनमधून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. त्यांचा बंदोबस्त केला जाईल.
नाशिकची बलस्थाने कशी प्रमोट करणार?
उद्योगांसाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. सातपूर, अंबडमध्ये प्रत्येकाला भूखंड हवाय, ही बाब जरी खरी असली तरी दिंडोरी, अक्राळे, घोटी, माळेगाव, सिन्नर यासह जिल्ह्यातील अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया झाली आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी उभारण्याबाबतही उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. याशिवाय नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. रस्ते, रेल्वे, विमानसेवा आदी दळणवळणाची साधने असल्याने उद्योगांसाठी नाशिक रोड कार्पेटप्रमाणे आहे. उद्याेगांचा विकास करताना नाशिकचे पर्यावरण जपण्याचाही उद्योजकांचा प्रयत्न असेल.