नाशिक : विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. 15 जागांसाठी १९६ उमेदवार नशीब आजमावत असून, त्यात 20 महिला उमेदवार आहेत. निवडणूक लढणाऱ्या या महिलांमधून कोण विधानसभेची पायरी चढणार हे येत्या २३ तारखेला निकालानंतरच स्पष्ट होईल.
राज्यात महिला सबलीकरण, त्यांचे प्रश्न व सुरक्षेवर सर्वच राजकीय पक्षांकडून वारंवार आवाज उठविण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र, विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. भाजप व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रत्येकी दोन महिलांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व मनसेकडून प्रत्येकी एका महिलेला संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेसने एकाही महिलेला तिकीट दिलेले नाही. याशिवाय अन्य छोटे-मोठे पक्ष व अपक्ष अशा 13 महिला निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
जिल्ह्यात देवळाली मतदारसंघातून सर्वाधिक पाच महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत, तर दिंडोरी व इगतपुरीत प्रत्येकी तीन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नाशिक मध्य, मालेगाव मध्य व बागलाणला प्रत्येकी दोन महिला उमेदवार आहेत. तसेच नाशिक पश्चिम, नांदगाव व चांदवडमध्ये प्रत्येकी एक महिला निवडणुकीला सामाेरी जात आहे. या महिलांमधून कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महायुती : देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), सरोज अहिरे (देवळाली), राजश्री अहिरराव (देवळाली)
महाविकास आघाडी : दीपिका चव्हाण (बागलाण), सुनीता चारोस्कर (दिंडोरी)
अन्य / अपक्ष : निर्मला गावित (इगतपुरी), मोहिनी जाधव (देवळाली), शान-ए-हिंद (मालेगाव मध्य), जयश्री गरुड (बागलाण), चंचल बेंडकुळे (इगतपुरी), वैशाली व्हडगर (नांदगाव), आयेशा सिद्दिका (मालेगाव मध्य), मंगला भंडारी (चांदवड), सविता गायकवाड (दिंडोरी), सुशीला चारोस्कर (दिंडाेरी), अवंतिका घोडके (नाशिक मध्य), भारती वाघ (देवळाली), लक्ष्मी ताठे (देवळाली), बेबी तेलम (इगतपुरी).