Simhastha Kumbh Mela Nashik File Photo
नाशिक

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ सुरू, तरी नियोजन अद्यापतरीच!

Simhastha Kumbh Mela | अमृतस्नानासाठी उरले अवघे नऊ महिने; भूसंपादनाबाबत आखाडा परिषदेची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाचे प्रतीक असलेला ध्वजारोहण सोहळा दि. ३१ ऑक्टोबर रोजी दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडवार, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहण करण्यात आले.

या माध्यमातून नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचे निमंत्रण देशरातील साधू - महंतांपर्यंत पोहोचले असले, तरी त्यांच्या निवासाची प्रमुख व्यवस्था असलेल्या साधूग्रामचे नियोजन अद्याप अधांतरी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात दि. २४ जुलै रोजी आखाड्यांचे ध्वजारोहण होणार असून, अमृतस्नानासाठी अवघे नऊ महिने शिल्लक असताना, जमिनीचा ताबा, शेतकऱ्यांचा मोबदला, वृक्षतोडीवरील स्थगिती आणि पाणीपुरवठाचे प्रश्न कायम असल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

साधूग्रामसाठी सुमारे १,४०० एकराहून अधिक जागेची आवश्यकता असून, यातील काही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, तर सुमारे १९१ एकर जमीन कायमस्वरूपी संपादित करण्याचे नियोजन असून, त्यासाठी अंदाजे २,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उर्वरित १,९०० ते १,२०० एकर जमीन तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन आहे. मात्र, २००३ च्या कुंभमेळ्यात वापरलेल्या जमिनीचे भाडे आणि नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

जुनी थकबाकी मिळाल्याशिवाय नव्याने जमीन देणार नसणारी भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. दुसरीकडे, तपोवनातील सुमारे १,७0० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध झाल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने डिसेंबर २०२५ पासून वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे साधूग्राम जागेच्या विकासाबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, प्रशासनाने मार्च २०२६ पर्यंत विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी प्रत्यक्षात साधूग्राम जमिनीचा प्रश्न सुटल्याशिवाय कामांना गती मिळणे कठीण आहे. त्यामुळे ध्वजारोहणाचा उत्साह आता प्रत्यक्षात तयारीत उतरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्वाचे टप्पे:

  • २४ जुलै: आखाड्याचे ध्वजारोहण

  • २४ जुलै २०२७: आखाडा ध्वजारोहण

  • २९ जुलै २०२७: नगर प्रदक्षिणा

  • २ ऑगस्ट २०२७: पहिले अमृत स्नान

  • ३१ ऑगस्ट २०२७: दुसरे अमृत स्नान

  • ५ सप्टेंबर २०२७: ऋषी पंचमी पर्व स्नान

  • ११ सप्टेंबर २०२७: तिसरे अमृत स्नान - वैष्णव आखाडे

  • १२ सप्टेंबर २०२७: तिसरे अमृत स्नान - शैव आखाडे

  • २४ जुलै २०२८: सांगता समारंभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT