नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात तीन अमृतस्नानांसह तब्बल ६५ अतिरिक्त पर्वणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून, या काळात सुमारे १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येणार आहे. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये पर्यटन, व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार असून, सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देणारा ठरणार आहे.
त्यामुळे आगामी सिंहस्थाकडे धार्मिक पर्वणीसोबतच आर्थिक विकासाची मोठी संधी म्हणून पाहिले जात असल्याचे सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात 'द स्टॉल्व्हर्ट्स टॉक्स'तर्फे आयोजित 'नाशिकचे रस्ते, कुंभमेळा आणि नाशिककर' या विषयावर व्याख्यान देताना नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
यावेळी त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची सविस्तर माहिती उपस्थितांना देताना कुंभमेळ्याच्या आयोजनातील विविध टप्पे, प्रशासकीय यंत्रणांची भूमिका, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या कामांवर संवाद साधला.
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी संधी ठरणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्त्यांचे जाळे, घाटांचे सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्था आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन यामुळे नाशिकच्या विकासाला दीर्घकालीन गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते, बाह्यवळण मार्ग, वाहतूक व्यवस्थापन, वाहनतळांची निर्मिती यांसारख्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गोदावरी नदी परिसरातील घाटांचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची ये-जा, वाहतूक नियंत्रण, सुविधा केंद्रांची उभारणीच्या नियोजनाचे त्यांनी यावेळी सादरीकरण केले. मिलिंद जहागिरदार यांनी आभार मानले. यावेळी दत्तात्रय देशमुख, सूरज सोनार, अमोल कुलकर्णी, अभिषेक आयचित, वंदना जहागिरदार, लक्ष्मी सोनार, अमय कुलकर्णी, आशिष जोशी, मुग्धा कुलकर्णी, वैशाली सायंदे आदी उपस्थित होते.