नाशिक : कुंभमेळासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोघांचे नाव लागावे हा आमचा प्रयत्न राहणार असून कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असल्याचा दावा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा मिळाल्यामुळे येथील विकासाला फायदा होणार असून यामुळे कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून मदत मिळेल अशी प्रतिक्रिया देखील महाजन यांनी दिली.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर वादावर भाष्य केले आहे. साधू महंताशी चर्चा करण्यासाठी मी त्र्यंबकेश्वरला आलोय.आखाडा परिषद अध्यक्षांसोबत यासंदर्भात चर्चा करणार आहे. तसेच कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोघांचे नाव लागावे हा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्र्यंबकेश्वरचा तीर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा मिळाल्याने कुंभमेळ्यासाठीही निधी मिळणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची कामेही वेगाने होणार आहे.
सिहंस्थात प्रदूषणाचा मुद्दा महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत माहिती घेतली आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहोत आणि यात आम्हाला यश मिळेल असा दावाही महाजन यांनी केला आहे. सोबतच सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वर साठी कॉरिडॉर करणार असून त्यासाठी काही अतिक्रमण काढले जाणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. देशभरातून भाविक इथे येतात, त्यामुळे हा कॉरिडॉर होणारच आणि आम्ही ते करणारच असा दावाही त्यांनी केला आहे.
वरणगाव येथे जवानाला वीरमरण आले होते. त्या जवानाला विरचक्र अर्पण करण्यासाठी मी गेलो होतो त्यावेळी ट्रक वर चढताना मला रॉड लागला परंतु, टाके पडले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.