Pune Jamun Market Pudhari
नाशिक

Nashik Jamun Price Market Rate | गुणकारी जांभळाची दररोज क्विंटलमध्ये विक्री

प्रतिकिलो ३०० ते ५०० रुपये दर : आदिवासी बांधवांच्या अर्थकारणाला वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

शरीरात अमृतासमान कार्य करणाऱ्या जांभळाची शहरात दररोज क्विंटलमध्ये विक्री केली जात असून, आदिवासी बांधवांच्या अर्थकारणाला वेग आला आहे. सध्या जांभळाला प्रतिकिलो ३०० ते ५०० रुपये इतका दर असून, दररोज एक विक्रेता सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची कमाई करीत आहे. शरणपूर रोड भागात १० ते १५ शेतकरी जांभूळ विक्री करीत असून, ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला विक्रीसाठी येणारा आदिवासी भागातील 'मेवा' शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला दिलासा देणारा ठरतो. जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, पेठ, इगतपुरी या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जांभळाचे उत्पादन घेतले जाते. केवळ महिनाभराचा हंगाम असलेल्या जांभूळ विक्रीतून या भागातील शेतकऱ्यांसह आदिवासींच्या हाताला रोजगार मिळतो.

इगतपुरी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जांभळाची झाडे लावलेली आहेत. मे महिन्यात या झाडांना फळधारणा होत असून, मे अखेरीस जांभळाचे फळ विक्रीसाठी बाजारात आणले जाते. एका झाडामधून सुमारे ५ ते ६ क्विंटल जांभूळ मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सध्या शरणपूर रोडसह शहरातील बहुतांश भागात क्विंटलमध्ये जांभूळ विक्रीसाठी आणले जात असून, त्याला मागणीदेखील मोठी आहे.

हक्काची बाजारपेठ हवी जांभूळ विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्यामुळे विक्रेत्यांचा हिरमोड होतो. शहरात शरणपूर रोडवर जांभूळ विक्रेते नजरेस पडतात. मात्र, या विक्रेत्यांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हटविले जात असल्यामुळे त्यांना व्यवसाय करताना अडचणी उद्भवतात. त्यामुळे प्रशासनाने हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

वाइनसाठीही मागणी

जांभळापासून वाइननिर्मितीचा प्रयोग नाशिकमध्येच करण्यात आला असून, वाइनसाठीदेखील जांभळाला मागणी आहे. मात्र, वाइन उत्पादकांकडून दर कमी दिला जात असल्यामुळे शेतकरी थेट बाजारपेठेत जांभूळ विक्री करीत आहेत. वाइन उत्पादक जांभळाला प्रतिकिलो १५० रुपये इतका दर देतात.

यंदा अधिक काळ पुरवठा

यंदा निरभ्र वातावरण, उन्हाची सातत्यपूर्ण तीव्रता आणि कोरडे हवामान यामुळे जांभळाच्या फळधारणेला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. फळांचा दर्जा चांगला असल्यामुळे चांगल्या दराने त्याची विक्री केली जात आहे. पाऊस लांबल्यामुळे आणखी काही दिवस जांभळाचा पुरवठा कायम राहण्याचा अंदाज आहे. जांभळाच्या झाडावरून फळांचा पडणारा सडा यामुळे दुष्काळाची चर्चादेखील रंगत आहे.

महिनाभराचाच हा हंगाम असल्याने, मी, माझी पत्नी आणि मुलगा दररोज क्विंटलहून अधिक जांभळाची विक्री करतो. सुरुवातीला जांभळाचा दर ५०० रुपये प्रतिकिलो होता. आता तो ३०० रुपयांवर आला आहे. जांभूळ हे फळ आरोग्यदायी असल्याने, त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा पावसाळा लांबल्यामुळे जांभळाचा हंगाम वाढण्याची शक्यता आहे. पाऊस आल्यास पुन्हा भातशेतीची कामे सुरू होणार आहेत.
- लालूमन बोडके, जांभूळविक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT