नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात साजऱ्या होणाऱ्या बारा गाड्या यात्रोत्सवासह रमजान ईदनिमित्त भद्रकालीत खरेदीसाठी होणारी गर्दी व शाही नमाजपठणासाठी एकत्रित येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी सातपूर व भद्रकाली परिसरातील वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
प्रवेश बंद : त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिस स्टेशन ते महिंद्रा सर्कल दुहेरी रस्त्यावर उद्या, रविवारी (दि. ३०) दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग : सातपूर पोलिस ठाणेसमोरून सातपूर एमआयडीसी रस्त्याने जलतरण तलावाकडून मार्गस्थ होतील.
प्रवेश बंद : दूध बाजार चौक ते वाकडी बारव, वाकडी बारव ते चौक मंडई, चौक मंडई ते महात्मा फुले पोलिस चौकीपर्यंत उद्या, रविवारी (दि. ३०) दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग : भद्रकाली टॅक्सी स्टँडपासून पिंपळ चौकमार्गे त्र्यंबक पोलिस चौकीकडून मेनरोड, सारडा सर्कलमार्गे गंजमाळवरून मेनरोड, महात्मा फुले चौकाकडून द्वारका सर्कलमार्गे इतरत्र वाहने जातील.
प्रवेश बंद : मुंबई नाका सिग्नल ते गडकरी सिग्नल, सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना सोमवारी (दि. ३१) सकाळी सात ते दुपारी १ किंवा चंद्रदर्शनानुसार ईद साजरी होणाऱ्या दिवशी त्याचवेळेत प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग : मुंबई नाक्यावरून संदीप हॉटेलकडून सारडा सर्कल व भवानी सर्कलकडे वाहने जातील. यासह टिळकवाडी सिग्नलमार्गे कान्हेरेवाडीकडून इतरत्र वाहने जातील.
बारा गाड्या यात्रोत्सवासह ईदनिमित्त सातपूर व भद्रकाली पोलिस ठाण्यासह गुन्हे शोध पथके, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, निर्भया, दामिनी मार्शल्स आणि विशेष शाखेचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यात्रोत्सवादरम्यान, हुल्लडबाजी करणाऱ्यांसह भुरट्या चोरांवर नजर ठेवण्यात येणार आहे. यासह ईदनिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.