Maharashtra Vehicle Sales Pudhari
नाशिक

Black Film Tinted Glass | नाशिकमध्ये काळ्या काचा असणाऱ्या गाड्यांवर धडक कारवाई; महिन्याभरात वसूल केला तब्बल 10 लाखांचा दंड!

Black Film Tinted Glass | शहर वाहतूक विभागाची 562 वाहनचालकांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहनांच्या काचांना नियमबाह्य पद्धतीने ब्लॅक फिल्म लावून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध शहर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार तसेच पोलिस उपायुक्त मुख्यालय / वाहतूक चंद्रकांत गवळी व सहायक पोलिस आयुक्त शहर वाहतूक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि वाहनांच्या काचांवरील ब्लॅक फिल्ममुळे दृश्यमानता कमी होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, हा या मोहिमेचा उद्देश आहे. शहरातील वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने ब्लॅक फिल्मचा वापर करू नये, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. ब्लॅक फिल्ममुळे वाहनाच्या आतील भागाची दृश्यमानता कमी होते.

परिणामी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाकडून दि. २९ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान नियमबाह्य ब्लॅक फिल्मचा वापर करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण ५६२ केसेस करण्यात आल्या. या कारवाईत ९ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्म काढून टाकण्यात आल्या आहेत.
वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर नियमबाह्य ब्लॅक फिल्मचा वापर करू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कारवाई टाळण्यासाठी वाहनांच्या काचांवर नियमबाह्य फिल्म लावणे टाळावे आणि वाहतूक सुरक्षेला प्राधान्य द्यावे.


मोहीम कालावधी:

  • २९ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२६

  • ब्लॅक फिल्म प्रकरणे : ५६२

  • दंडाची रक्कम : ९ लाख ६० हजार रुपये

  • कारवाई : वाहनांवरील काळी फिल्म काढली

  • कारवाईचा उद्देश : वाहतूक नियमांचे पालन व सुरक्षितता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT