बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई Pudhari News network
नाशिक

Nashik Traffic : शहरात बेशिस्त वाहतुकीविरोधात 18 लाख 74 हजारांचा दंड

वाहतूक शाखेकडून 819 रिक्षांवर कारवाई, 35 रिक्षा स्क्रॅप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील वाहतुकीचे नियम तोडणारे वाहनचालक आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्याविरोधात नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेने मोहीम राबवली आहे. या मोहिमेत विविध नियमभंग प्रकरणांत १८ लाख ७४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

वाहतुकीसंबंधी नागरिकांच्या तक्रारींसाठी पोलिस आयुक्तालयाचा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. या क्रमांकावर सर्वाधिक तक्रारी बेशिस्त वाहतूक व रिक्षाचालकांविरोधात प्राप्त झाल्याने वाहतूक शाखेचे पोलिस सक्रीय झाले. २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत या मोहिमेत कारवाई करण्यात आली.

  • बीएनएस कलम २८५ - १०३ गुन्हे

  • एमव्ही ॲक्ट - ६०३ खटले

  • एकूण ८१९ रिक्षांवर कारवाई

  • आरटीओ व वाहतूक विभागाच्या संयुक्त मोहिमेत ११८ रिक्षांवर कारवाई तर ३५ रिक्षा स्क्रॅप

  • ई - चलनद्वारे २४१५ केसेस नोंदवून १८ लाख ७४ हजार ८५० रुपये दंड आकारण्यात आला

कारवाईचा उद्देश शिस्त

नाशिक पोलिस आयुक्तालयाचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त निर्माण करणे, शहरातील वाहनचालक तसेच पादचारी नागरिकांची वाहतूक सुरळीत व सुरक्षित करणे हा आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ट्रॅफिक एज्युकेशन पार्क (मुंबई नाका) येथे २ तासांचे वाहतूक शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलनद्वारे ऑनलाईन कारवाई सुरू राहणार आहे. पोलिस आणि आरटीओच्या संयुक्तरीत्या मोहिम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

वाहनचालकांच्या वारंवार या चूका

सिग्नल जंप करणे, स्टॉपलाईनच्या पुढे थांबणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट प्रवास, जादा प्रवासी वाहतूक, युनिफॉर्म नसणे, कागदपत्रे न बाळगणे, वाहनांवर काळी फिल्म किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणे, विनानंबर वाहन चालवणे, मुदत संपलेली वाहने चालवणे तसेच बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणे या सर्व प्रकारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन व्हावे यासाठी ‘सीपी व्हॉट्सॲप क्रमांक 9923323311 सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर वाहतुकीसंबंधी जादा तक्रारी प्राप्त झाल्याने नागरिकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT