नाशिक : पहलगाम येथे अडकलेले जिल्ह्यातील अनेक पर्यटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे नाशिकला सुखरूप परतले आहेत. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक पर्यटक श्रीनगर येथेअ डकले होते. या पर्यटकांमध्ये शिवसेना विद्यार्थी सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख किरण फडोळ आणि त्यांचा मित्र परिवार देखील होता. फडोळ यांनी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची स्वीय सचिव अभिजीत दरेकर यांच्याशी संपर्क साधला. या पर्यटकांची चिंता लक्षात घेता चौधरी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. अडकलेल्या कुटुंबियांना नाशिकमध्ये सुखरूप परत आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत तात्काळ दखल घेत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सुचनेनुसार विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. अडकलेल्या पर्यटकांना मोफत विमानसेवेच्या माध्यमातून सुखरूपपणे परत नाशिक येथे आणण्यात आले.
दरम्यान, या नागरिकांना मदतकार्याबद्दल सर्व कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहायक अभिजीत दरेकर यांचे आभार मानले. संकटाच्या काळात आपला माणूस आपल्या सोबत उभा आहे अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली..
रवींद्र दराडे, दीपाली दराडे, श्रुतिका दराडे, कृतिका दराडे, रोहिदास वामन फडोळ, स्वाती फडोल, राशी फडोळ, श्रीश फडोळ, कांचन फडोळ, शौर्य फडोळ, किरण फडोळ, स्वप्नील लक्ष्मण मानकर, पूजा मानकर, शौर्य मानकर, पार्थ मानकर, ज्ञानेश्वर गटकळ, वैष्णवी गटकळ, श्लोक गटकळ, आनंद दरगोडे.