Nashik Tourism
Pudhari
नाशिक

Nashik Tourism | 'कनेक्टिव्हीटी', 'व्हर्जिन डेस्टीनेशन'मुळे नाशिकचे पर्यटन वाढले

विनयार्ड, पावसाळी, कृषी पर्यटनही बहरले; पक्षी- प्राणी अभयारण्यही केंद्रबिंदू l दोन वर्षात पर्यटक संख्येत तिपटीने वाढ झाल्याचे निरीक्षण

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : निल कुलकर्णी

'वायनरीज'मुळे वाढलेले जागतिक पर्यटक, वाढलेली कृषी पर्यटन केंद्रे, देशातील प्रमुख नगरांशी जोडणारी विमानसेवा यासह निसर्ग भ्रमंतीची 'व्हर्जिन डेस्टीनेशन्स' यासह सर्वाधिक गड, किल्ले आणि पर्यटन व्यवसायला मिळत असलेला 'उद्योगाचा दर्जा' यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या दोन वर्षात तिपटीने वाढ झाल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.

नाशिकचे पर्यटन हे काही वर्षांपूर्वी धार्मिक नगरी आणि त्या अनुषंगाने योणारे यात्रेकरु इतकेच सिमती होते. गेल्या काही वर्षात यात मोठा बदल झाला असून तीर्थटनासाठी येणाऱ्या भाविकांसह जिल्ह्यातील ६८ किल्ले, साहसी पर्यटनासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगा, निसर्ग आणि मोसमी पर्यटनासाठी सामाजिक माध्यमांमुळे जगाच्या नकाशावर आलेली अनेक 'व्हर्जिन डेस्टीनेशन्स', विपूल जलाशये, सक्षम कृषीक्षेत्रामुळे होणारे कृषीपर्यटन आणि वायनरीज उद्योगामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे आश्वासक चित्र आहे.

जिल्ह्यात एकूण लहान- मोठे ६९ किल्ले असून नुकतेच बागलाण येथील सोल्हेर किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकन मिळाले आहे. भिवतास, बिलकससारखी निसर्गरम्य स्थळे आहेत. धरणांचा जिल्हा असल्याने समृद्ध शेती आहे. त्यामुळे कृषी पर्यटन बहरले आहे. आल्हादायी वातावरणामुळे वेलनेस टूरिझम, आरोग्यधाम (सॅनेटोरियम)ची वाढती संख्या, रामसरचा दर्जा मिळालेले नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व हरणांसाठी प्रसिद्ध ममदापूर, बाेरगड जवळील मोरांचे वन, अशी पक्षी- प्राणी ठिकाणे आकर्षणे आहेत. स्वा. सावरकर, तात्या टोपे यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांची भूमी असलेल्या भूमीत भौगोलिक वैविध्य, पश्चिम घाटाचा मोठा भाग, यामुळे पर्यटकांना पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्र्यंबक, वणी, इगतपुरी (विपश्यना केंद्र)सह शिर्डीशी जवळ यामुळे येथे येणारा भाविक पर्यटक वाढतच आहे. कुंभमेळा जागतिक स्तरावरील श्रद्धेचा महोत्सवही येथे भरत असल्याने मूलभूत सेवासुविधांसाठी प्रचंड निधी उपब्धता, विकासही वाढणाऱ्या पर्यटनाचे एक कारण ठरत आहे. आधी धार्मिक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन दीड दिवसात नाशिक सोडणारा पर्यटकांना बहुविध पर्यटन पर्याय उपलब्ध झाले आहेत. वाढलेल्या सोयी-सुविधांमुळे, 'कनेक्टीव्हीटी' आदी कारणांनी पर्यटकांचा नाशिक येथील मुक्काम वाढला आहे. येत्या काळात नाशिक पर्यटनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होण्याकडे वाटचाल करत आहे, असेही मत अभ्यासक नोंदवतात.

पर्यटनास उद्योगाचा दर्जा मिळला आहे. खाजगी लोकांनी अनेक सेवा- सुविधांचे रिसॉर्ट, हॉटेल्स नाशिकमध्ये उभारण्यास सुरुवात केल्याने उत्तम सेवा उपबल्ध होत आहेत. त्यामुळे नाशिक पर्यटन वाढले. 'टूरिझम'मध्ये गुंतवणूक करणाऱ्या खाजगी व्यक्तींना पर्यटनविभागातर्फे अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- जगदिश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, नाशिक.
वाढते ताण- तणाव. अस्थिरता यामुळे 'डोमेस्टीक' पर्यटक श्रद्धास्थाने, मंदिरे अन‌् अध्यात्माकडे वळत आहेत. नाशिकला येणाऱ्या पर्यटकांमध्ये ८० टक्के हे धार्मिक, तीर्थक्षेत्र म्हणून येणारे भाविक असतात. हवाई सेवा, पावसाळी पर्यटन अन‌् पक्षीतीर्थ बघण्यास येणाऱ्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
कॅ. निलेश गायकवाड, पर्यटक अभ्यासक. पुणे

पर्यटन वाढीची प्रमुख कारणे

- लोकांच्या क्रयशक्तीत वाढ, प्रमुख महानगरांशी हवाई 'कनेक्टिव्हीटी' सेवा

- कृषी, साहसी, दूर्ग-पुरातत्व अन‌् निसर्ग पर्यटन केंद्रांकडे वाढलेला कल

- विनियार्ड व वायनरीज निगडीत फेस्टीव्हल्समुळे जागतिक पर्यटक

- अस्थिरता, कामाचा वाढता ताण-तणाव यामुळे पर्यटनातून मन:शांती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.