Heavy Rains :  (Pudhari File Photo)
नाशिक

Nashik Rain Flood | शहर, जिल्ह्यात अतिवृष्टी; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

Nashik Rain Flood | विभागीय, कुंभमेळा, पोलिस, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलिस अधीक्षकांकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यात सुरू अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वच अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देत, आपत्कालीन स्थितीत नागरिकांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश पवार यांनी आपत्कालीन ठिकाणांना भेटी देत, परिस्थितीचा आढावा घेतल्याने सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला.

नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, ओझर, कळवण, पेठ, सिन्नर या भागात धुवाधार पाऊस झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले. नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने, बहुतांश भागांत धोकादायक स्थिती निर्माण झाली. अशात सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरत आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गोदावरी नदीला आलेल्या पुराची पाहणी करीत, नदीपात्रालगत सुरू असलेल्या सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. गेडाम यांनी संबंधितांना सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने प्रतिसाद देण्याबाबतच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी डॉ. आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे आदी उपस्थित होते. याशिवाय कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी, पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने, मुसळधार पावासाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य अडचणी ओळखण्यासाठी पाहणी दौरा केला.

यावेळी त्यांनी, जलनिस्सारण, साधुग्राम, घाट परिसर, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोदावरीला आलेल्या पुराची पाहणी करीत, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना राबविण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील उपस्थित होते.

तसेच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनीदेखील पूरपाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीदेखील शहरातील विविध भागांत पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश पवार यांनी चांदोरी येथे भेट देत, गोदावरी पुराची पाहणी केली. तसेच संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. आमदार हिरामण खोसकर यांनी अधिवेशनातून धाव घेत इगतपुरी शहरातील पूरस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत सुमारे दोन तास पाहणी केली.

जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी २४ तास सज्ज राहून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे. नागरिकांनीही प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT