नाशिक महानगरपालिका www.pudhari.news  
नाशिक

Nashik | टॉप १०० थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ६०७ कोटींवर पोहोचल्यानंतर मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी करण्यात आलेली कर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या करवसुलीवर परिणाम करणारी ठरली आहे. यामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सर्वेक्षण संपताच येत्या १ फेब्रुवारीपासून बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १०० बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी वसुलीसाठी २२५ कोटींची ते पाणीपट्टी वसुलीसाठी ७५ कोटींचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ एप्रिल २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या दरम्यान १६२ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत १९.८७ कोटींची वाढ झाली आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीत अपेक्षित यश महापालिकेच्या पदरी पडू शकलेले नाही. मनुष्यबळाच्या अभावामुळे पाणीपट्टीच्या देयकांचे वाटपही मुदतीत होऊ न शकल्याने गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत जेमतेम ३४.३२ कोटींची पाणीपट्टी वसूल होऊ शकली आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीत २.४८ कोटींची घट झाली आहे. परिणामी, चालू वर्षातील करासह घरपट्टीची थकबाकी ४८८ कोटी, तर पाणीपट्टीची थकबाकी ११९ कोटींवर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या थकबाकी वसुलीसाठी कर विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला ३०० थकबाकीदारांकडील वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत शासनाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात महापालिकेतील बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे.

आठवडाभरात जेमतेम २.१६ कोटींची वसुली
२१ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या करवसुली विभागाने १६० कोटींची घरपट्टी वसूल केली होती. २१ जानेवारीपासून इम्पेरिकल डाटासंदर्भात सर्वेक्षणासाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने करवसुलीवर मोठा परिणाम झाला. या कालावधीत जेमतेम २.१६ कोटींचीच घरपट्टी वसूल होऊ शकली आहे.

१०० बड्या थकबाकीदारांकडे २० कोटी थकीत
मराठा समाजासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाची प्रक्रिया येत्या ३१ जानेवारीअखेर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १०० बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या १०० बड्या थकबाकीदारांकडे महापालिकेची सुमारे २० कोटींपेक्षाही अधिक घरपट्टी थकीत आहे.

मराठा समाजाच्या इम्पेरिकल डाटाकरिता करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाकरिता करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ जानेवारीअखेर सर्वेक्षणाची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर १ फेब्रुवारीपासून थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू केली जाईल. मिळकतधारकांनी आपल्याकडील थकबाकीची रक्कम भरून कटू कारवाई टाळावी. – श्रीकांत पवार, उपायुक्त(कर), मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT