नाशिक : खंडग्रास सूर्यग्रहण भाद्रपद कृ. ३०, रविवारी (दि.२१) होणार आहे. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाच्या काळात केले जाणारे धार्मिक विधी करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती धर्म अभ्यासकांनी दिली.
भारतीय वेळेनुसार या वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण भाद्रपद अमावास्येला रविवारी (दि.२१) होणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशातून ग्रहण दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणात केले जाणारे धार्मिक विधी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती धर्म अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी दिली. ग्रहणाची सुरुवात रात्री ११ वाजता होईल आणि सोमवारी (दि.२२) दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी ते संपणार आहे. ग्रहण कालावधी ४ तास २३ मिनिटांपेक्षा अधिक असू शकतो.
सर्वपित्री अमावस्या रविवारी (दि.२१) होत आहे. पितृकार्य श्राद्धादी कर्म केले असता आयु, आरोग्य, पुत्र, स्वर्ग, र्कीती, पुष्टी, सुख, धन,धान्य, समृद्धी मिळते, असे सांगितले आहे. पितृतिथी माहित नसल्यास किंवा काही कारणांने तिथीस श्राद्ध करता आले नाही तर सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी केले जातात.