नाशिक : विमान इंधनाचे दर वाढल्याने, देशभरातील विमान कंपन्यांनी आपल्या सेवांत कपात करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी त्यांची उड्डाणे २२ टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका नाशिकच्या विमानसेवेलाही बसला आहे. गोवा आणि हैदराबाद या दोन महत्त्वांच्या सेवांवर आता गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिका- इराण युद्धामुळे
जगभरात इंधन कोंडी निर्माण झाली आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युअल या विमान इंधनाच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा विमान कंपन्यांना मोठा फटका सहन करावा लागत असून, त्यांनी सेवांमध्ये कपात केली आहे. केंद्राने इंधन दरासह करांत सवलत न दिल्यास सेवा आणखी घटवण्याचा इशारा त्यांनी मेच्या प्रारंभीच दिला होता. त्यानुसार एअर इंडिया व इंडिगोने आपल्या सेवांत प्रत्येकी २२ टक्क्यांनी कपातीची घोषणा केली आहे.
त्याचा नाशिकच्या विमानसेवेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, बंगळुरू या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यातील हैदराबाद, गोव्यासह अन्य काही सेवांत कपात होण्याची शक्यता आहे. याबाबत इंडिगोकडून कोणतेही निवेदन दिलेले आलेले नाही. मात्र, लवकरच कपातीचा निर्णय अंमलात आणला जाईल, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान आवाहनानंतर प्रवाशांकडून विमान प्रवास टाळला जात आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत असताना, प्रवासी संख्याही कमी होत असल्याने कंपन्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम नाशिकच्या सेवेवर होण्याची शक्यता आहे. युद्ध थांबल्यास परिस्थिती पूर्ववत होईल.-मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा