नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून नाशिक शहरात राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यात येणार असून, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्स उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे.
नाशिकने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गुणवंत खेळाडू घडविले आहेत. मात्र, दर्जेदार सरावासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. नव्या सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना नाशिकमध्येच उच्च दर्जाच्या प्रशिक्षण व सरावाची संधी मिळणार आहे.
नव्या फुटबॉल मैदानावर उच्च दर्जाचे लॉन, अद्ययावत ड्रेनेज व्यवस्था आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेसह मानक आकाराच्या मैदानासाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सरावाची गुणवत्ता वाढण्याबरोबरच खडबडीत मैदानामुळे होणाऱ्या दुखापती कमी होण्यास मदत होणार आहे. या मैदानावर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसह व्यावसायिक फुटबॉल लीगचे आयोजन करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
हुतात्मा कान्हेरे मैदानावर हाय-मास्ट फ्लडलाइट्स उभारल्यामुळे क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करता येणार आहे. शाळा, महाविद्यालय किंवा नोकरी सांभाळणाऱ्या खेळाडूंना सायंकाळनंतरही सरावाची संधी मिळेल. त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धांच्या दिवस-रात्र सामन्यांचेही आयोजन शक्य होणार आहे.
या सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांची संख्या वाढून बाहेरील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी शहरात येण्याची शक्यता आहे. त्याचा पर्यटन, हॉटेल व वाहतूक व्यवसायालाही फायदा होणार आहे. परिणामी नाशिकची 'स्पोर्ट्स हब' म्हणून ओळख निर्माण होण्यास चालना मिळेल, असा विश्वास क्रीडा जगतातून व्यक्त होत आहे.