Nashik Bullet Train Project 
नाशिक

Nashik Bullet Train Project | जपानच्या सहकार्याने नाशिकला बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी

Nashik Bullet Train Project | ठाणे-पुणे-नाशिक आर्थिक सुवर्णत्रिकोण आकारास येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जपान सरकारच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या अहमदाबाद-मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाशी आता नाशिकलाही जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रकल्पामुळे ठाणे-पुणे-नाशिक असा नवा आर्थिक सुवर्णत्रिकोण आकारास येण्याची शक्यता आहे.

या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही शहरे अवघ्या दीड ते दोन तासांत गाठणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारकडून पूर्वी मंजूर झालेला नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग रखडल्यानंतर आता जपानच्या पुढाकारामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना मिळाली आहे.

जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान (एएफजे) यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि. २९) नाशिक महापालिकेत प्रभारी आयुक्त अमित रंजन यांच्यासोबत जपानी सल्लागार टीमची उच्चस्तरीय बैठक झाली. यात अहमदाबाद-मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुख्य मार्गाला नाशिक फीडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण झाले. या प्रकल्पामुळे नाशिकच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

नवा आर्थिक सुवर्णत्रिकोण अहमदाबाद

मुंबई- हैदराबाद या विस्तारित बुलेट ट्रेन मार्गाला नाशिक फीडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे-पुणे-नाशिक हा नवा प्रादेशिक विकासाचा त्रिकोण निर्माण होणार असून, यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी क्रांती घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, लॉजिस्टिक आणि औद्योगिक विकासाला या प्रकल्पामुळे नवी गती मिळणार आहे.

वाइन, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना:

या हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीचा सर्वाधिक फायदा नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग, वाइन टुरिझम, औद्योगिक कॉरिडॉर आणि जलद मालवाहतुकीला होणार आहे. द्राक्ष, कांदा आणि इतर नाशवंत शेतमाल मोठ्या बाजारपेठांमध्ये कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. तसेच मुंबई, पुणे आणि हैदराबाद येथून पर्यटकांची संख्या वाढल्यास नाशिकमधील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळणार आहे.

अहमदाबाद-मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनशी नाशिकचा कनेक्ट वाढल्यास नाशिकच्या विकासाला मोठी गती मिळेल. या प्रकल्पामुळे नाशिक हे मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि औद्योगिक हब म्हणून उदयास येईल. कृषिपूरक उद्योग आणि वाइन उद्योगालाही याचा मोठा फायदा होईल.
अमित रंजन, प्रभारी आयुक्त, नाशिक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT