देवळा : बंद घरे सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने देवळा तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच घरे शनिवारी (दि.२) मध्यरात्री चोरट्यांनी फोडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वरनगरात राहणारे सुराणा पतसंस्थेचे संचालक सुभाष सोनवणे हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते. या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केले. सोन्याचे दागिने, वस्तू व रोकड मिळून ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तर गुंजाळनगर येथील बाळासाहेब सोनजे यांचे सेफ्टी डोअर (लोखंडी दरवाजे) तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटांमध्ये शोधाशोध केली मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
त्यानंतर तालुक्यातील खुंटेवाडी येथील निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब भामरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड लंपास केली. देवाजी रौदळ यांच्याही बंद घराचे कुलूप तोडत चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय देवळा येथील गोवर्धन प्रजापत हे कुटुंब लग्नसमारंभासाठी गावी गेलेले होते. तेथेही घरफोडीचा प्रयत्न झाला मात्र किती ऐवज गेला ते कळू शकले नाही. ज्ञानेश्वरनगर येथे श्वानपथक तसेच ठसेतज्ञ यांना पाचारण करत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.