कुलूप बंद पोलीस चौकी समोर संताप व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, शैलेश शिंदे, विजय धनवटे आदी. pudhari photo
नाशिक

Nashik | नगरसूलच्या आठवडे बाजारात चोरट्यांची हातसफाई

दहा मोबाईल, मंगळसूत्र चोरीला

पुढारी वृत्तसेवा

नगरसूल : शुक्रवारी येथील आठवडे बाजार व पोळा सण बाजार असल्याने बाजार पेठेत मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बाजारात हातसफाई करत दहा जणांचे महागडे अँड्रॉइड मोबाईल हातोहात लंपास केले. तसेच बाजारासाठी आलेल्या एका शेतकरी महिलेचे मंगळसूत्र देखील अज्ञात चोरट्याने नजर चुकवून ओरबडले.

ही बाब महिलेच्या लक्षात येताच महिलेने येथील पोलीस चौकी समोर येऊन हंबरडा फोडला. येथील दिपक डुकरे, विजय धनवटे, नंदकिशोर पुंड, रामनाथ फकीरा बोढारे, आदींचे महागडे मोबाईल चोरी गेल्यानंतर आठवडे बाजार परिसरात जवळच असलेल्या पोलीस चौकीत त्यांनी धाव घेतली. मात्र आठवडे बाजार व पोळ्याचा बाजार असताना व मोठी गर्दी असतांनाही दिवसभर पोलीस चौकी कुलूपबंद होती. एकही पोलीस कर्मचारी तिथे आज फिरकला नाही. त्यामुळे किमती मोबाईल चोरीला गेलेले रहिवासी व येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पवार यांनी पोलीस चौकी बंद असल्याने संताप व्यक्त केला.

महिलांना आमिष दाखवून फसवणूक 

तसेच नगरसुल गावात 18 ते 22 वर्षाचे तरुण मुलं वेगवेगळे आमिष दाखवून नागरिक व महिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिराच्या नावाखाली वर्गणीसाठी पैसे मागतात. महिलांसाठी कमी किमतीत कुकरसारख्या स्किमा असल्याचे सांगतात. महिलांना आकर्षित करणाऱ्या वस्तू घेऊन फिरतात. हातात एक कुकर तेच कुकर घेऊन अख्ख गाव फिरतात. कमी पैसे द्या तुमच्या नावाने बुक करा कंपनीची गाडी येईल तुम्हाला घरपोच करेल असे आमिष देतात. वेगवेगळे फंडे वापरुन महिलांना व गरीब लोकांना फसवत आहे. अशांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

चौकीला पोलिस द्या 

तसेच नगरसुल पोलीस चौकी ही कायम बंद असून फक्त रात्री बाहेर एक लाईट चमकताना दिसतो. चोरांना चौकी बंद असल्याचा मोठा फायदा होत असून वरिष्ठांनी याची दखल घेऊन नगरसुल चौकीला निदान दोन पोलीस तरी देणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थ चर्चेतून करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT