चांदवड : अपघातस्थळी नमुने संकलित करताना फॉरेन्सिक विभागाचे पथक (छाया : सुनिल थोरे)
नाशिक

Nashik | मद्यमाफियांचा थरार ! रेल्वे फाटक तोडले, शासकीय वाहनही उडवले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील शासकीय वाहनास अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने धडक दिल्याने विभागाचे वाहन चालक कैलास गेणू कसबे (५१, रा. गंगापूर) यांचा मृत्यू झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार पथकातील तीन वाहनांनी संशयित वाहनाचा रविवारी (दि.७) रात्री ११.३० ते सोमवारी (दि.८) मध्यरात्री २.१५ वाजेपर्यंत पाठलाग केला. मात्र, अपघात झाल्याने पाठलाग थांबवून अपघातग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात आले.

  • अपघातात चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला.

  • गंगापूर गाव येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • तीन कर्मचारी जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने रविवारी रात्री महामार्गावर सापळा रचला होता. काळ्या रंगाची क्रेटा कार ( जीजे १९ बीई ८८८६) भरधाव इगतपुरीहून नाशिकच्या दिशेने येत होती. गरवारे पाँइट येथे पथकाने ही कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भरधाव वाहन चालवून तेथून पळ काढला. त्यामुळे भरारी पथकाने इतर पथकांना संदेश देत वाहन अडवण्यास सांगितले. आडगाव नाका येथेही वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. संशयित वाहन द्वारका सर्कलवरील सर्व्हिस रोडवरून आडगावच्या दिशेने जात होती. त्यामुळे नागरगोजे यांनी रस्त्यावर थांबून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने नागरगाेजे यांनाही कट मारून पुढे गेला. त्यानंतर जत्रा हॉटेल येथून नांदुरनाका मार्गे चालक विंचुरच्या दिशेने पळाला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री १२.४५ वाजता 'डायल ११२' ला संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार लासलगाव पोलिसांनी पथकास मदत पाठवली. दरम्यान, क्रेटा वाहन विंचुरमार्गे लासलगावच्या दिशेने गेले. त्यांनी त्याठिकाणी पोलिसांनी उभारलेले बॅरकेडींग उडवले, तसेच रेल्वे क्रॉसिंगवरील फाटकही उडवून पसार झाले.

दरम्यान, लासलगाव पोलिस ठाण्यातील अंमलदार अरुण बाळासाहेब डोंगरे व शशिकांत देविदास निकम हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे स्काॅप्रिओ वाहन (एमएच १५ एचएम ८८५९) मध्यभागी बसले. हे वाहन कैलास कसबे चालवत होते तर त्यांच्या पाठीमागे टाटा सुमो हे शासकीय वाहन (एमएच १५ जीएफ १८४०) आणि खासगी वाहन (एमएच १२ व्हीएल ७७५७) मधील पथक संशयित क्रेटा वाहनाचा पाठलाग करीत होते. दरम्यान, पथकांच्या वाहनांना हुलकावणी देत क्रेटा चालक चांडवडच्या दिशेने गेला. मौजे हरनुल शिवारात आल्यानंतर कसबे यांनी शासकीय वाहनाने संशयित वाहनास अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित वाहनाच्या चालकाने शासकीय वाहनास बाजुने धडक दिली. त्यात वाहन सिमेंटच्या रस्त्यावरून बाजूला गेले. रस्त्याच्याकडेला असलेल्या मोठ्या दगडावर शासकीय वाहन आदळले. त्यात वाहनाची पुढील बाजु आदळून वाहनाने तीन पलट्या खात बाजूला कोसळली. त्यात कसबे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागील इतर दोन वाहनांनी अपघात झाल्याने अपघातस्थळी थांबून बचावकार्य सुरू केले. जखमींपैकी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान राहुल पवार आणि पोलिस अंमलदार अरुण डोंगरे यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत तर शशिकांत निकम यांच्यावर चांदवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संशयित क्रेटा वाहनात दोन व्यक्ती होत्या. वाहनात परराज्यातील मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पथकाच्या वाहनास ठोस मारून अपघात करून पळ काढला. लवकरच दोघांना अटक केली जाईल.
शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

लेक, पत्नीनंतर कुटुंब प्रमुखाची एक्जिट

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ साली कसबे यांच्या मुलीचे निधन झाले होते. तर कोरोना काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. कसबे हे मनमिळावू स्वभावाचे होते. विभागातील सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव गत वर्षी त्यांनी दुसरा विवाह केला हाेता. मात्र, त्यांचेही अपघातात निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

विभागाकडून कसबेंना सलामी

विभागाकडून कसबेंना सलामी

कैलास कसबे यांच्यावर गंगापूर गाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते. सर्वांनी मिळून कसबे यांना सलामी देत अंतिम निरोप दिला. यावेळी कसबे यांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT