देवळाली कॅम्प: देवळाली मतदारसंघात मेळाव्याप्रसंगी लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ, सुनील कोथमीरे, डॉ. सुवर्णा दोंदे, विलास पवार, बी. वाय. पगारे, संजय कुऱ्हाडे, संतोष साळवे, प्रा. जयंत आहेर, डॉ. शिवानी पवार यांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.  (छाया : सुधाकर गोडसे)
नाशिक

नाशिक : देवळालीत उमेदवारीसाठी सर्वे ठरणार किंगमेकर

पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅम्प: सुधाकर गोडसे

थेट १९७८ पासून अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला व २००९ नंतर पुनर्रचनेनंतरही राखीव राहिलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध महाआघाडीकडून कोण उमेदवार द्यायचा, यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विविध सर्वेचा आधार घेतला जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इच्छुकांसमोर स्पष्ट केले.

१९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या देवळाली मतदारसंघावर २०१९ पर्यंत घोलप परिवाराचा पगडा होता. २०१९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीने शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करत सरोज अहिरे यांच्या माध्यमातून पक्षाचा झेंडा रोवला. पक्षाच्या फुटीनंतर आ. अहिरे या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात राहिल्याने शरद पवार गटाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. त्यासाठी पक्षाकडून दररोज वेगवेगळ्या इच्छुकांच्या मुलाखती व प्रवेश दिले जात आहेत.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील व इतर नेत्यांनी देवळालीत मतदारांसमोर पक्षाची भूमिका मेळाव्याच्या माध्यमातून मांडली. राखीव असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असल्याने पक्षालाही त्याचे हायसे वाटले असून शरद पवारांच्या करिश्मावर अनेकांनी आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यामुळेच की काय पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागणाऱ्या 13 पैकी नऊ उमेदवारांनी काल शिवस्वराज्य यात्रेनिमित्त हजेरी लावत शक्तीप्रदर्शन केले. मात्र या सर्वांचा जाहीर गौरव न करता बंद खोलीत आमदार पाटील यांनी त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका, एकसंघपणा, उमेदवार निवडीचे निकष याबाबत स्पष्ट वाच्यता केली. यावेळी कोणीही इच्छुकांनी आपले मत मांडली नाही. उलट त्यांनाच पक्षाची ध्येयधोरणे सांगण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी समजावून सांगितली. ज्या पद्धतीने आज तुम्ही एकत्र आहात हे बघून आनंद होत असला तरी, पुढेही एकत्र राहा, पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी एकसंघ उभे रहा तरच विजय आपला राहील, असा स्पष्ट संदेश त्यांनी इच्छुकांना दिला.

बंद खोलीत चर्चा

बंद खोलीत झालेल्या चर्चेवेळी यावेळी लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ, सुनील कोथमीरे, डॉक्टर सुवर्णा दोंदे, विलास पवार, बी. वाय. पगारे, संजय कुऱ्हाडे, संतोष साळवे, प्रा. जयंत आहेर हे उपस्थित होते. पक्षाकडून इच्छुकांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आलेली असून ती पार पाडणाऱ्यांनाच या मुलाखतीत संधी मिळाल्याचे दिसून आले. काही तळ्यात-मळ्यात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याला हजेरी लावली. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला संधी मिळाली नाही.

पक्षातर्फे लवकरच दुसरा सर्वे

पक्षाने एक सर्वे केलेला असून लवकरच दुसरा सर्वे होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जनतेमध्ये जाऊन काम करा. आम्ही कोणताही सर्वे मॅनेज करत नाही अथवा मॅनेज सर्वेला काम देत नाही. हे सांगताना मागील वेळेस 13 ते 14 जागांवर सर्वेव्यतिरिक्त आम्ही उमेदवार उभे केल्याने ते पराभूत झाले होते. त्यामुळे यंदा सर्वे हा उमेदवारीसाठी महत्त्वाचा घटक राहणार आहे हे जयंत पाटील यांनी स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT