सिडकोतील गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरचे नाव उघड pudhari photo
नाशिक

Nashik | सामाजिक कार्यकर्त्याची खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी दीपक बडगुजरचा शोध सुरुच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सामाजिक कार्यकर्त्याची खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचा युवा नेता दीपक सुधाकर बडगुजर हा फरार झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. दीपकला अटक केल्यानंतर खुनाची सुपारी कोणत्या कारणामुळे व किती रुपयांची दिली हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ( Deepak Badgujar's name revealed in CIDCO firing case)

काय आहे प्रकरण : कोरोना काळात रिपाईंचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि संशयित अंकुश शेवाळे आणि दीपक बडगुजर यांच्यात नाशिक येथील सिडको भागातील त्रिमूर्ती चौक परिसरात वाद झाला होता. यानंतर दीपक बडगुजरने अंकुश शेवाळेच्या माध्यमातून सराईत गुन्हेगार मयूर बेदला जाधव यांच्यावर गोळीबार करून धमकवण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

नाशिकमध्ये दोन वर्षांपूर्वी रिपाईंचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दीपकने गोळीबाराची सुपारी दिल्याचं तपासात उघड झाल्यानंतर पोलीस दीपक बडगुजरचा शोध घेत आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी गुंडा विरोधी पथक व अंबड पोलिसांनी नुकतेच सहा संशयितांना पकडले. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर (Deepak Badgujar) यांचा विश्वासू साथिदार अंकुश शेवाळे याचाही समावेश आहे. सखोल तपासात मयुर बेद यास अंकुशने प्रसाद शिंदे मार्फत वेळोवेळी २ लाख रुपये पोहचवले होते. त्यामुळे जाधव यांच्यावर हल्ला करण्यासाठी दीपकच्या सांगण्यावरून मयुरला सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुशला अटक केल्यापासून दीपक बेपत्ता झाल्याचे समजते. त्यामुळे पोलिसही त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो अद्याप सापडलेला नाही. दरम्यान, दीपक व अंकुश यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी का दिली याचे कारण गुलदस्त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपकला पकडल्यानंतर हे कारण समोर येईल असा दावा पोलिसांचा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT