मुलींचा जन्मदर pudhari file photo
नाशिक

नाशिक : ‘मुलगाच वंशाचा दिवा’ ही बुरसटलेली कल्पना कायम; मुलींचा जन्मदर घसरला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मानवाची चंद्र आणि मंगळावर वस्ती वसविण्याचे प्रयत्न सुरू असताना नाशिकसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात ‘मुलगाच वंशाचा दिवा’ ही बुरसटलेली कल्पना कायम असून, याचाच परिपाक म्हणून मुलींचा जन्मदर घसरल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यातील मुलींचा जन्मदर तपासला असता दर हजार पुरूषांमागे मुली जन्मन्याचे प्रमाण सरासरी ८९८ पर्यंत खाली आले आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुलींचा जन्मदर ८६८ या नीचांकी पातळीवर होता. यामुळे शहरात स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. (898 girls per thousand boys sex ratio in Smart city Low birth rate of girls Nashik news)

महात्मानगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला. पंड्या हॉस्पिटलमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत या रुग्णालयात गर्भपाताच्या औषधांचा साठाही आढळून आला. संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे शहरात अवैध गर्भपात तसेच त्यामाध्यमातून स्त्री भ्रूण हत्या सर्रासपणे होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

गेल्या सहा वर्षांतील जन्मदराची आकडेवारी अशी...

  • वर्ष - जन्मदर

  • २०१९ - ९२०

  • २०२० - ९१२

  • २०२१ - ९११

  • २०२२ - ८८५

  • २०२३ - ९१५

  • ऑगस्ट २०२४ - ८९८

मुलींचा हा जन्मदर ८९८ (Girls Birth Rate)

जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांमध्ये शहरातील रुग्णालयांमध्ये मुला-मुलींचा जन्मदर तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली. या कालावधीत ७,५२५ मुलगे जन्माला आले. त्यातुलनेत केवळ ६७६० मुलींचा जन्म झाला. दर हजार मुलांमागे मुलींचा हा जन्मदर ८९८ इतका आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुलींचा जन्मदर हा सर्वात नीचांकी पातळीवर अर्थात ८६८ इतका होता. गर्भलिंगनिदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सोनोग्राफी केंद्रांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही छुप्या पध्दतीने गर्भलिंग निदान होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे.

तपासणी कागदावरच?

सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच मुलींचा जन्मदर घटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दर तीन महिन्यांनी शहरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करणे बंधनकारक आहे. यासाठी विभागीय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. ही तपासणी केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.

गर्भलिंगनिदान कायद्यानुसार स्त्रीलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची माहिती देण्यासाठी १८००२३३४४७५ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. संबंधित केंद्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित केंद्राची माहिती देणाऱ्यास शासनाकडून तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT