नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने महिलेच्या मृतदेहावरील मंगळसूत्र चोरल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने पोलिसांनी आणि मृताच्या नातलगांनी कर्मचाऱ्याची अंगझडती घेतल्याने चोरलेले दागिने मिळून आले. दरम्यान, याबाबत नातलगांनी अद्याप तक्रार न दिल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या घटनेची दिवसभर रुग्णालयात चर्चा होती.
इंदिरानगर येथील एका दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे बुधवारी उघड झाले. पोलिसांनी पंचनामा करून तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. सकाळी दहाच्या सुमारास हे मृतदेह अपघात विभागात ठेवले होते. त्यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यापूर्वी त्यांच्या अंगावरील दागिने नातलगांना द्या, अशी सूचना पर्यवेक्षकाने कर्मचाऱ्यास केली. कर्मचाऱ्याने मृत महिलेची मान वर उचलली, तेव्हा गळ्यातील पोत तुटलेली दिसली. त्याने ही बाब पर्यवेक्षकास व महिलेच्या नातलगांना सांगितली. मृतदेह आणला तेव्हा पोत तुटलेली नव्हती, असा दावा नातलगाने केला. त्यामुळे मृतदेह कुणी रुग्णालयाच्या इमारतीत आणला याची चौकशी केल्यानंतर संबंधित सफाई कर्मचाऱ्याचे नाव समोर आले. त्यामुळे नातलग व पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता खिशात सोन्याचे मणी आणि मंगळसूत्राच्या वाट्या मिळून आल्या. घटनेनंतर तो पसार झाला. मात्र, नातलगांनी तक्रार दाखल न केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित सफाई कर्मचारी हा कायमस्वरूपी असून, त्याच्याविरोधात याआधीही अनेक तक्रारी आल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेकदा गैरहजर असणे, कामात दिरंगाई करणे अशा तक्रारी वारंवार असल्याने त्याची रुग्णालयातील बहुतांश कक्षांमध्ये बदली केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याच्या वागणुकीत सुधारणा झाली नसल्याचे बोलले जाते. संवेदना मृत झाल्यागत त्याने चोरी केल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार अर्जाची प्रतीक्षा प्रशासन करत असल्याचे समोर आले