Sinner Devnadi River
देवपूर : पुरामुळे वाहून गेलेल्या देवनदीवरील अर्धवट अवस्थेत असलेला धोकादायक पूल. (छाया : संदीप भोर)
नाशिक

नाशिक : दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेला पूल होईना दुरुस्त

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर (नाशिक) : दोन वर्षांपूर्वी देवनदीला आलेल्या पुरामुळे देवपूर येथील वाहून गेलेल्या पुलाच्या भागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही बांधकाम केलेले नाही. त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करून या पुलावरून प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बारागावपिंडी ते कोळपेवाडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. नाशिक व नगर जिल्ह्यास जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गावर देवपूर येथे देवनदीवर पूल बांधण्यात आला आहे. पूल बांधताना संपूर्ण नदीपात्रात आरसीसी कॉक्रीटमध्ये त्याचे काम करणे गरजेचे असताना त्याचे नदीपात्रातच अर्धे काम करून भराव टाकून तो रस्त्याला जोडण्यात आला होता. त्यामुळे पूर आल्यानंतर नदीचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. प्रवाह इतका मोठा होता की, त्याने हा भराव तोडल्याने मानमोडा परिसरातून रस्ता बंद झाला

आपत्ती निवारणामध्ये हा पूल बांधून दिला जाईल, असे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगून या ठिकाणी पाइप व त्यावर भराव टाकून रस्ता सुरू करून दिला. मात्र, दोन वर्षे उलटूनही पूल मंजूर झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी या ठिकाणी पुलाची दुरुस्ती करून पुढील जीवितहानी टाळावी, अशी मागणी माजी आमदार कै. सूर्यभान गडाख यांचे नातू, युवा नेते अभिषेक गडाख यांनी केली आहे.

तेरा किमी अंतर कापून करावा लागला अंत्यविधी

गावातील एक अंत्यविधी तर खोपडीमार्गे १३ किमीचा प्रवास करत गावाच्या पलीकडील स्मशानभूमीत आणण्यात आला. गावातून शेतात व शेतातून गावात येणाऱ्या शेतकऱ्यांना वडांगळी व खोपाडीमार्गे त्यावेळी प्रवास करावा लागत असे. मात्र, एवढे सगळे घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधण्याची संवेदनशीलता दाखवली नाही.

दोन वर्ष झाल्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडलेला दिसतो. विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाची काळजी करून या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. त्यासाठी संवेदनशीलता दाखवावी.
अभिषेक गडाख, युवक नेते

जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास

देवपूर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा त्याचप्रमाणे सिन्नर येथे शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी याच मार्गे जातात. दोन वर्षांपूर्वी पूल वाहून गेल्याने बराच काळ विद्यार्थी शिक्षणास मुकले होते. एक ट्रक उलटा झाल्याने त्यात धारणगाव येथील एक युवक वाहून गेला.

SCROLL FOR NEXT