नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थंड हेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान एप्रिल महिन्याच्या मध्यातच चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. रविवारी (दि. १२) हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून, कमाल तापमान ३९.५, तर किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. गेल्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा नाशिककरांसाठी तापदायक ठरण्याचे संकेत मिळाले होते.
मात्र, मार्चच्या अखेरीस गारपिटीसह अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिल्याने, वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एप्रिलच्या मध्यातच तापमान चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने, एप्रिलअखेरपर्यंत नाशिकचे कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जळगावमधील कमाल तापमानाने यापूर्वीच चाळिशी पार केली असून, जळगावचे तापमान ४२ अंशांच्या जवळ आहे. नंदुरबारमध्ये देखील उष्णतेचा कहर बघावयास मिळत आहे. पाठोपाठ धुळे आणि नाशिकही तापल्याने, उत्तर महाराष्ट्रातील जनतेला यंदाचा उन्हाळा हा असह्य असणार आहे.
रविवारी सुट्टीचा वार असतानादेखील दुपारच्या सुमारास बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. शहरातील सर्वच मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. तसेच नाशिककर घराबाहेर पडताना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सन गॉगल्स, टोपी, रुमाल परिधान करून घराबाहेर पडताना दिसून आले. याशिवाय थंडपेयाची दुकानेदेखील जागोजागी उभारण्यात आली असून, याठिकाणी देखील नागरिकांची गर्दी दिसून आली.
आरोग्य सांभाळा
घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे. विशेषतः शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे आवश्यक आहे.
अन्यथा चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे लक्षणे येऊ शकतात. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त द्रव आहार घ्यावा, असेही आवाहन आरोग्यतज्ज्ञांकडून केले जात आहे.