नाशिक / लासलगाव : उत्तरेकडील शीतलहरींमुळे जिल्ह्याच्या पाऱ्यात सातत्याने घसरण होत आहे. वातावरणामधील या बदलाचा फटका अवघ्या जिल्ह्याला बसत आहे. निफाडमध्ये शनिवारी (दि. ३०) नीचांकी ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्येही पारा ८.९ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. बोचऱ्या वाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना हुडहुडी भरली आहे.
हिमालयामधील बर्फवृष्टी तसेच दक्षिण भारतात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. निफाडच्या तापमानात अवघ्या २४ तासांमध्ये ३.१ अंशांची घसरण होत पारा थेट ७ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे महाबळेश्वर व लोणावळ्यापेक्षा निफाड थंडगार झाले आहे. हवेतील गारठ्यात वाढ झाल्याने तालुकावासीयांना हुडहुडी भरली आहे. हवामानातील या बदलाचा फटका द्राक्षबागांना बसण्याचा धोका असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. दुसरीकडे नाशिक शहराचा पारा ९ अंशांखाली घसरला असून, यंदाच्या हंगामात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर थंड वारे वाहात असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा कडाका अधिक जाणवत असल्याने जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबरमध्ये पाऱ्यात लक्षणीय घट होते. पण, यंदा हिवाळ्याची चाहूल उशिरा लागली असतानाही नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीने जोर धरला. दिवसागणिक तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांसमवेत शेकोट्यांभोवती गर्दी होत आहे. दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा झोत अधिक दाट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिकसह राज्यामध्ये थंडीच्या कडाक्यात वाढ हाेऊ शकते.