Nashik Temperature  FILE
नाशिक

Nashik Temperature | नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, उष्णतेच्या लाटेची शक्यता

दुपारी बाजारपेठा सामसूम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आठवडाभर सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नाशिककरांना उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाशात ढग दाटून आल्याने उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली होती, मात्र उकाडा कायम आहे. रविवारी तापमान पुन्हा वाढल्याने उन्हाचे चटके तीव्र झाले आहेत. कमाल तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडत आहेत.

मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढली. त्याचा जनजीवनावरील परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील भद्रकाली, मेन रोड, पंचवटी कारंजा, शालिमार येथील रस्त्यांवर दुपारच्या सत्रात वर्दळ कमी होते. बाजारातील व्यवसायही मंदावला आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

12 मार्च रोजी नाशिकचे कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअसपर्यंत, तर रविवारी (दि. 16) किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, विनाकारण उन्हात बाहेर न जाणे आणि सैल, सुती व फिकट रंगांचे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

मार्च उजाडताच उन्हाळ्याची चाहूल लागली. घरोघरी 24 तास पंखे अन‌् वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढला आहे. भर उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी बत्ती गुल झाल्यास नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत नागरिकांकडून महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिक कामासाठी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रालाच प्राधान्य देत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 च्या दरम्यान बाजारात गर्दी दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT