नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा प्रभाव कायम असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात किंचित चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. त्यानुसार सोमवारी (दि. १६) नाशिक शहरात किमान १४ अंश सेल्सिअस, तर कमाल ३१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
निफाडमध्ये किमान तापमान ११.१, तर कमाल ३२.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दरम्यान, गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडी स्थिरावल्याचे दिसून येत असून, उत्तरकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीपासून तापमानात मोठे बदल होत आहेत.
२ नोव्हेंबरला नाशिक शहराचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर त्यात लक्षणीय घट झाली. शनिवारी (दि. १४) पारा १३.४ अंशांवर, तर रविवारी (दि. १५) १२.६ अंशांवर पोहोचला होता. सोमवारी त्यात किंचित वाढ होऊन तापमान १४ अंशांवर स्थिरावले.
पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असून, मॉर्निंग वॉल्कसाठी बाहेर पडणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे. रात्री काही ठिकाणी शेकोटीचा आधार घेतला जात आहे. थंड वाऱ्यांमुळे गारवा जात असल्याने नागरिक स्वेटर, जॅकेट आणि मफलरचा वापर करत आहेत.
दरम्यान, किमान आणि कमाल तापमानातील मोठ्या तफावतीमुळे सकाळी-रात्री थंडी, तर दुपारी उन्हाचा अनुभव नागरिकांना येत असून, उत्तरकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्यास आगामी काळात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.