शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल File Photo
नाशिक

Nashik Teachers Constituency | शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सोमवारी (दि.१) सकाळी ८ पासून अंबड येथील वेअर हाउसमध्ये करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत विवेक कोल्हे, किशोर दराडे, ॲड. संदीप गुळवे व महेंद्र भावसार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधान परिषदेची पायरी कोण चढणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा २१ उमेदवार रिंगणात होते. मात्र, महायुतीचे दराडे, महाविकास आघाडीचे ॲड. गुळवे, अपक्ष कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भावसार यांच्यामध्ये चाैरंगी लढत झाली. प्रचारात एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप तसेच शिक्षकांना पैठणी, नथ, पैसे तसेच अन्य वस्तूंच्या वाटपामुळे निवडणूक चांगलीच गाजली. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानावेळी विभागातील तब्बल ९३.४८ टक्के शिक्षकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त केले.

त्यानंतर सोमवारी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील गाेदामात मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सहा टेबल याप्रमाणे एकूण ३० टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. एका टेबलवर १ पर्यवेक्षक व २ अधिकारी याप्रमाणे तीन असे एकूण ९० अधिकारी व कर्मचारी हे मतमोजणीची प्रक्रिया पार पडतील. प्रत्येकी सहा टेबलची जबाबदारी एका जिल्हाधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच मतमोजणीचे दोनदा प्रशिक्षण दिले गेले आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अंबड येथील गोदामाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कोटा पूर्ण करणारा विजयी

मतमोजणीवेळी सर्वप्रथम पाचही जिल्ह्यांच्या मतपत्रिका एकत्रित करून त्यातून वैध व अवैध मतपत्रिकांची विभागणी केली जाईल. अवैध मतपत्रिका बाजूला काढल्यानंतर उर्वरित मतपत्रिकांवरून कोटा ठरविण्यात येईल. त्यामध्ये वैध मतपत्रिकांच्या पन्नास टक्के अधिक एक याप्रमाणे मते घेणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT