Nashik Teachers Constituency
नाशिक : शिक्षक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयश्री खेचल्यानंतर कुटुंब अन् समर्थकांसमवेत आनंद व्यक्त करताना आमदार किशोर दराडे. Pudhari Photo
नाशिक

Nashik Teachers Constituency | किशोर दराडे दुसऱ्यांदा बनले गुरुजींचा आवाज!

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : मिलिंद सजगुरे

नामसाधर्म्याच्या घोळापासून बनावट मतदारांची नावे घुसवण्यापर्यंत आणि अपक्ष उमेदवार अपहरणापासून सालंकृत नजराण्याच्या दातृत्वापर्यंत नाना मुद्द्यांमुळे राज्यभर चर्चिल्या गेलेल्या विधान परिषद नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अखेर विद्यमान सदस्य किशोर दराडे यांनी विजयी पताका फडकावली. शिक्षकांचा आवाज बनणाऱ्याला आमदारकीचा टिळा लावणारी ही निवडणूक शत-प्रतिशत राजकीय स्वरूपाची ठरलीच, शिवाय यापुढे आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांनीच ती लढवण्याचे धारिष्ट्य दाखवावे, असा अप्रत्यक्ष संदेशही त्यामधून मिळाला.

पाच जिल्हे आणि ५४ तालुक्यांच्या परिघात येणाऱ्या या निवडणुकीतील पहिल्या दिवसापासूनच्या घडामोडी दखलपात्र राहिल्या. गतवेळी मूळ शिवसेनेकडून निवडून आलेल्या किशोर दराडे यांनी दुसऱ्यांदा मैदानात उतरताना शिवसेना शिंदे गटाची झूल पांघरली. काँग्रेसशी नाळ जुळलेल्या ॲड. संदीप गुळवे यांनीही सीमोल्लंघन करीत उबाठा गटाचे राजकीय अधिपत्य स्वीकारले, तर भाजपची पार्श्वभूमी असूनही अपक्ष उमेदवारी करीत कोपरगावच्या विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेच्या मागील निवडणुकीतील तांबे पॅटर्न स्वीकारला. अजित पवार राष्ट्रवादीच्या महेंद्र भावसार यांनी मैदानात उतरून महायुतीतील दरी अधोरेखित केली. निवडणूक रिंगणात एकूण २१ जण असले, तरी त्यापैकी केवळ सात उमेदवार शिक्षकी पेशातील होते, तर उर्वरित शैक्षणिक संस्थाचालक. प्रत्यक्षात निवडणूक चाैरंगी होण्याची चिन्हे असताना, राष्ट्रवादीचे भावसार फारसा प्रभाव दाखवू न शकल्याने ती तिरंगी झाली. त्यामध्येही विवेक कोल्हे आणि संदीप गुळवे यांच्या मताधिक्यात फारसा फरक राहिला नाही आणि दराडे निर्णायक आघाडी घेत विजयी झाले.

शिवसेना शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच तासांंच्या नाशिक दौऱ्यात शिक्षण संस्थाचालकांची बैठक घेऊन दराडेंच्या विजयासाठी साकडे घातले होते. उबाठा गटाचे संपर्कनेते संजय राऊत यांनीही गुळवे यांच्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधून वातावरणनिर्मिती केली होती. गुळवे यांना मविप्र संस्थेच्या संचालक मंडळाचाही पाठिंबा होता. विवेक कोल्हे यांनी मविप्रच्या माजी सरचिटणीस आणि जवळच्या नातलग नीलिमा पवार यांच्यामार्फत बांधबंदिस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्यात मतविभागणीचा फटका बसू नये म्हणून राजेंद्र विखे यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात निवडणुकीत न उतरता, भाजपने युतीधर्म म्हणून दराडे यांना साथ दिल्याचे सांगितले जात असले, तरी मग कोल्हे नेमके कोणाचे उमेदवार, या चर्चांना निवडणुकीदरम्यान उधाण आले होते.

चर्चा लक्ष्मीदर्शन अन् सालंकृत नजराण्याची...

ही निवडणूक ज्या विविधांगी मुद्द्यांनी राज्यभर गाजली, त्यामध्ये मतदाराकृष्टीसाठी वापरल्या गेलेल्या क्लृप्त्यांचा समावेश आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याने खळबळ माजली होती. रजतमुद्रा, सुवर्ण नथ, ब्रँडेड कपडे आदींसह लक्ष्मीदर्शन घडवून मतदारांना वळवण्याचे प्रयत्न झाल्याच्या चर्चाही झडल्या होत्या.

शिवसेना शिंदे गटाला बूस्टर डोस...

लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेना शिंदे गटाला शिक्षक मतदारसंघातील विजयाने बूस्टर डोस मिळाला आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारण फार निर्णायक ठरले नसले, तरी चार महिन्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटासाठी हा निकाल मनोबल उंचावणारा ठरणार आहे. अर्थात, त्याचा प्रत्यक्षात लाभ किती होतो, हे येणारा काळ ठरवणार आहे.

SCROLL FOR NEXT