नाशिक शिक्षकमध्ये किशोर दराडे विजयी छाया - सुनिल थोरे
नाशिक

Nashik Teachers Constituency | ब्रेकिंग ! नाशिक शिक्षकमध्ये किशोर दराडे विजयी

गणेश सोनवणे

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क; विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला असून मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी होणारे दराडे हे पहिलेच उमेदवार ठरले आहे.

आमदार दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे यांना 17 हजार 372 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना 16 हजार 280 मते मिळाली. आमदार दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले आहेत.

महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ. गेडाम यांनी दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

 31 हजार 576 मतांचा कोटा

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद मतांची मोजणी

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसरी फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6 हजार 72 मते पडली.

ठाकरे गटाला धक्का

नाशिकमध्ये शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे व ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यात लढत होईल असे वाटत असताना मात्र अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे व किशोर दराडे अशी ही लढत झाली. संदीप गुळवे हे या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी राहिले. शिंदे गटाने गड राखल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT