नाशिक

Nashik Teacher Constituency Election | आज अर्ज छाननी, बुधवारपर्यंत माघारी

अंजली राऊत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. त्याची अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (दि ७) रोजी संपल्यानंतर आता माघारीबाबत उत्सुकता वाढली आहे. आज (दि. १)) अर्जांची छाननी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असून त्यानंतर बाद अर्जांची संख्या विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये ३८ अपक्ष, तर १५ पक्षीय उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सहा उमेदवारांना पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिले आहेत.

दरम्यान, विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी शिंदे गटाकडून, तर संदीप गुळवे यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. दिलीप पाटील यांनी काँग्रेसकडून, तर अजित पवार गटाकडून ॲड. महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुती आणि महाआघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे.

महायुतीकडून इच्छुक असलेल्या किशोर दराडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात आल्याने याबाबत चर्चा रंगली होती. उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने युती आणि आघाडीत माघारीपर्यंत काय नाट्य घडते, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील बेबनाव समोर येत असताना दुसरीकडे नामसाधर्म्य असलेले उमेदवार पक्षीय उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात असून त्यांचा कितपत प्रभाव पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बुधवारी माघारीची अंतिम मुदत

सोमवारी (दि. १०) अर्ज छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार (दि. १२) आहे. २६ जून रोजी सकाळी ७ ते दुपारी ६ या वेळेत या चारीही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार, १ जुलै रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै रोजी पूर्ण होईल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT