निखिल रोकडे
नाशिक : बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषण प्रकरणाने आता अत्यंत गंभीर व धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला केवळ शोषणाचा गुन्हा वाटणाऱ्या या प्रकरणात आता मानवी तस्करी, जबरदस्ती धर्मांतर आणि परदेशात पाठवण्याचा कट अशा अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला पासपोर्टच्या माध्यमातून थेट मलेशियाला पाठवण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू करण्यात आली होती. ज्यामुळे हा कट किती योजनाबद्ध होता याची कल्पना येते.
या प्रकरणातील आरोपीशी पीडितेची ओळख २०२२ मध्ये झाली होती. सुरुवातीला मैत्रीच्या माध्यमातून जवळीक वाढवण्यात आली. नंतर हळूहळू तिच्यावर मानसिक व भावनिक प्रभाव टाकण्यात आला. याच काळात तिने वर्षातील विशिष्ट कालावधीत रोजे ठेवण्यास सुरुवात केली. ही बाब सुरुवातीला घरच्यांच्या लक्षात आली नाही. मात्र, काही दिवसांनी तिची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तरीही तिने काहीही उघड केले नव्हते. घरी परतल्यानंतर वडिलांनी दिलेला ज्यूस घेण्यास तिने नकार दिला.
मात्र, सायंकाळी ७.१५ ते ७.३० च्या सुमारास तिने पाणी घेतले. यावरून घरच्यांना संशय आला. त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता ती नियमित रोजे पाळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेतल्यावर तिने संपूर्ण प्रकार उघड केला. त्यानंतर तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या कंपनीत अशाच प्रकारे इतर महिलांनाही जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महिलांना भावनिक, धार्मिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रभावित करत त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही प्रकरणांत परदेशात पाठवण्याची तयारीही सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
लैंगिक छळ प्रकरण
या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचीही शक्यता आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांचा संबंध परदेशी निधी किंवा टेरर फंडिंगशी असू शकतो का, याचीही तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे
संशयित आरोपींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणखी काही महिलांना परदेशात (मलेशिया) पाठवण्याबाबत बोलणे करून दिले होते, असे चौकशीत समोर आले आहे. हे बोलणे कोणत्या उद्देशाने करून दिले याबाबत पोलीस तपास करत आहेत.