आसिफ सय्यद, नाशिक
नाशिकच्या तपोवन परिसरातील 1,825 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीने संतप्त लोकांच्या जनरेट्यापुढे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना माघार घ्यावी लागली. यामुळे जनशक्ती एकवटली तर सरकारला कशी धूळ चारू शकते, याचे हे उदाहरण! साधुग्राम उभारणीच्या नावाखाली 33 एकर जागेत 220 कोटींचे पीपीपी तत्त्वावरील प्रदर्शन केंद्र हा निर्णय सुरुवातीपासूनच संशयास्पद होता. पर्यावरणवाद्यांचा प्रखर विरोध, शिवसेेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस या विरोधी पक्षांचा दबाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी महायुतीतीलच मित्रपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेनेने (शिंदे गट) आंदोलनाचे अस्त्र उगारत उचललेले भाजपविरोधी पाऊल या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला. यामुळे गिरीश महाजनांना अखेर प्रदर्शन केंद्राला स्थगितीची घोषणा करावी लागली.
सुरुवातीला ‘वृक्षतोड करणारच’ असा निर्धार करणारे महाजन, राजकीय समीकरणे ढासळू लागताच ‘प्रदर्शन केंद्र होणार नाही, निविदा स्थगित!’ असे म्हणू लागले. या सर्व घडामोडींतून भाजपची प्रतिमा मलीन होत होती, हेच अधोरेखित होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या गळ्यात अडकणारा हा मोठा दगड ठरू शकला असता. त्यात खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत थेट झाडतोडीचा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या विरोधातील वातावरण अधिकच तापवले. त्यामुळे आता 1,700 झाडांचे पुनर्रोपण व 15 हजार झाडांची नवीन लागवड करण्याची महाजनांची आकस्मिक तयारी हा केवळ जनतेचा रोष शांत करण्याचा प्रयत्न आहे, यात शंका नाही. सत्तेतील शिंदे सेनेवर महाजनांचा ‘विक्षिप्त’ असा शब्दप्रयोग म्हणजे घरातल्या घरात असलेला कलह सार्वजनिकरित्या झळकण्यासारखाच. तपोवनातील आंदोलनावरून भाजपची कोंडी स्पष्ट झाली असून, मित्रपक्षही पाठीमागे सरकत असल्याचे चित्र आहे. नागरिक, पर्यावरणप्रेमी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या निर्धारामुळेच हा विषय राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला. खरे पाहता हा संघर्ष केवळ 1,825 झाडांचा नाही, तर विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी घेणार्या एकतर्फी निर्णयशैली विरोधातील जनक्षोभ आहे. लोकशाहीचे धडे सत्तेला पुन्हा समजावून देण्याची ही वेळ लोकांनीच आणली आहे. तपोवनातील आंदोलन पेटले नसते, तर प्रदर्शन केंद्रांचे डोंबारी खेळ गुपचूप पुढे सरकले असते. आज महाजन जरी ‘हरित कुंभमेळ्याची’ स्वप्ने दाखवत असले, तरी जनतेच्या मनातील अविश्वास पुसणे सोपे नाही.
लढा अजूनही संपलेला नाही
लढा अजूनही संपलेला नाही. कुंभनगरी ही नाशिकची मूळ ओळख आहे. त्यामुळे वृक्षतोडीच्या विरोधाआड कुंभमेळा होऊ नये, अशी भूमिका कुणाचीही नाही. तशी ती करणे म्हणजे धर्मद्रोहच. पण, याचबरोबर सनातन संस्कृतीत वृक्षांनाही देवांचा दर्जा दिला गेला आहे, याचा विसर सत्ताधार्यांनाही पडता कामा नये. साधुग्रामच्या नावावर मक्तेदाराच्या भल्यासाठी प्रदर्शन केंद्र उभारणीकरिता झाडे तोडली जाणार असतील तर त्याविरोधात संघर्ष उभा राहणारच!