नाशिक : तपोवनातील वादग्रस्त माईस हब अर्थात प्रदर्शनी केंद्राच्या उभारणीला स्थगितीची घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली असली तरी, महापालिकेने मात्र या प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
प्रदर्शनी केंद्राच्या उभारणीसाठी कोणतीही वृक्षतोड केली जाणार नसल्याचा दावा करत महाजन यांच्यासमवेत चर्चा करून प्रदर्शनी केंद्राबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाजन यांनी स्थगितीची घोषणा करण्यापूर्वी महापालिकेने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती, असेही नायर यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारणीच्या नावाखाली १८२५ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी नागरिकांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवित आंदोलन सुरू केले आहे. त्यातच साधुग्रामच्या जागेवर पीपीपी तत्वावर प्रदर्शनी केंद्र उभारण्याची २२० कोटींची निविदा महापालिकेने प्रसिध्द केल्याने या आंदोलनाच्या आगीत तेल ओतले गेले. शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यासह विविध संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दर्शवित भाजपवर हल्लाबोल केला. उबाठा, मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आले. त्यापाठोपाठ सत्तारूढ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटानेही या वृक्षतोडीला विरोध करत आंदोलन केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. या प्रकरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या कुंभमेळा मंत्री महाजन यांनी बॅकफूटवर जात प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली. मात्र, त्याच दिवशी महापालिकेने प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे.
तपोवनात प्रदर्शनी केंद्राची उभारणी करताना वृक्षतोड केली जाणार नाही. प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला कुंभमेळा मंत्री महाजन यांनी स्थगिती देण्याच्या घोषणेपूर्वी महापालिकेने या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. महाजन यांच्याशी चर्चा करून निविदा प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येईल.करिश्मा नायर, प्रभारी आयुक्त, नाशिक महापालिका.
दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या प्रभारी आयुक्त नायर यांच्याशी संपर्क साधला असता प्रदर्शनी केंद्र उभारण्याच्या निविदा प्रक्रियेत पर्याप्त निविदाधारक सहभागी न झाल्यामुळे स्पर्धात्मक दर प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी(दि.५) सकाळी निविदा प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्यानंतर सायंकाळी मंत्री महाजन यांनी या प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला चर्चा करून स्थगिती देण्यात येईल, अशी माहिती माध्यमांना दिली. प्रदर्शनी केंद्राच्या उभारणीसाठी महापालिका कुठलेही झाड तोडणार नव्हती. त्यामुळे कुंभमेळा मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करून प्रदर्शनी केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती अथवा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे नायर यांनी सांगितले.