तपोवनात देशी-विदेशी झाडांची मोठी साखळीच असून, गोदावरी नदीकाठी असलेले हे एक महत्त्वाचे नैसर्गिक आवरण आहे. Pudhari News Network
नाशिक

Nashik Tapovan : जैवविविधतेने नटलेल्या तपोवनात देशी- विदेशी झाडांची साखळी

67 प्रकारची औषधी गुणधर्म असलेली वृक्षसंपदा : 52 जातींच्या पक्ष्यांचाही किलबिलाट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील तब्बल १,८२५ झाडे तोडण्याचा प्रशासनाने घातलेला घाट थेट येथील जैवविविधतेवर घाव करणारा ठरणार आहे. कारण येथे देशी-विदेशी झाडांची मोठी साखळीच असून, गोदावरी नदीकाठी असलेले हे एक महत्त्वाचे नैसर्गिक आवरण आहे. वड, पिंपळ, चिंच, उंबर यासारखी जुनी आणि डेरेदार झाडे नाशिककरांसाठी ऑक्सिजन फॅक्टरीच आहेत. याशिवाय येथे तब्बल ५२ जातींच्या विविध पक्ष्यांचा किलबिलाट असून, झाडांची कत्तल केल्यास तेही बेघर होणार आहेत.

सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या साधु, महंतांसाठी तपोवनात निवासव्यवस्था उभारण्यासाठी याठिकाणी गेल्या १२ वर्षांपासून किंबहूना त्यापेक्षा अधिक काळापासून डौलात उभी असलेल्या डेरेदार झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा प्रशासनाचा डाव आहे. याठिकाणी चिंच, वड, जांभुळ, करंज, उंबर, पिंपळ, बोर, बाभुळ आदींसह ६७ प्रकारची वृक्षसंपदा आहे. तसेच ५२ जातींच्या विविध पक्ष्यांचाही किलबिलाट आहे. यातील बरेच पक्षी स्थलांतरीत आहेत. त्यामुळे येथील वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालविल्यास नाशिकची पर्यावरण साखळी धोक्यात येईलच, याशिवाय पक्षी देखील बेघर होणार आहेत. तपोवनातील वृक्षसंपदेमुळे येथे जैवविविधतेची साखळी निर्माण झाली असून, त्यावर घाव घातल्यास त्याचे गंभीर परिणाम नाशिककरांना भोगावे लागण्याची शक्यता आहे.

तपोवनातील वृक्षसंपदा

पिंक सीडर, बैल, रेन ट्री, सप्तपर्णी, सीताफळ, फणस, कडूनिंब, कांचन, आपटा, काटेसावर, असण, शंकासूर, बॉटल ब्रश, हिंगण, सुरू, पांढरा काटेसावर, नारळ, भोकर, गुलमोहर, बांबू, निलगिरी, वड, विलायती उंबर, पिंपळ, ग्मेलिना, धायटी, आवळा, आफ्रिकन महोगनी, सॉसेज ट्री, सुबाभूळ, कवठ, आंबा, सोनचाफा, रात्रजाई/ हाडगुळा, देवदार, शेवगा, जमैकन चेरी, कदंब, शिंदी/खजूर, आवळा, विलायची चिंच, करंज, विलायती बाभूळ, पेरू, चंदन, रिठा, कॅसोड, सोनमुक, आफ्रिकन ट्युलिप, महोगनी, जांभूळ, जंगली चिंच, पिवळी टेकोमा, साग, अर्जुन, देशी बदाम, पारशी पिंपळ, गोड बाभूळ, बाभूळ, बोर, काशिद, रानमारी, गुलतुरा, रानतुळस, कॉसमस आदी.

52 जातींचे पक्षी

कोकीळा, हरियल, तांबट, शिक्रा, स्वर्गीय नर्तक, किंगफिशर, सनबर्ड, चष्मेवाला, बुलबुल, वेडाराखू, रामगंगा, वटवट्या आदींसह हिरवट पर्णवटवट्या, श्वेतकंठी वटवट्या, मलबारी मैना, टिकेल निळा माशिमार, काळा थिरथिरा या स्थलांतरीत पक्षांचा देखील तपोवनात आदिवास आहे.

महाराष्ट्र नामवंत पर्यावरण तज्ज्ञांसोबत परिदा फाउंडेशनने काही दिवसांपूर्वी तपोवनात सर्वेक्षण केले होते. याठिकाणी ६७ प्रकारची विविध झाडे सर्वेक्षणात आढळून आली. या झाडांचे पर्यावरणीयदृष्ट्या मोठे महत्त्व असून, येथील जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवण्यात ते मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
सौरभ झेंडे, संस्थापक अध्यक्ष, परिदा फाउंडेशन.

वृक्षतोड केल्यास असे होणार परिणाम

  • हवेची गुणवत्ता खालावणार

  • 'अर्बन हीट आयलॅण्ड'चा धोका वाढणार

  • उन्हाळ्यात तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल, उष्णतेच्या लाटा तीव्र होतील.

  • गोदावरीच्या काठावर मातीची धूप होणार

  • जमिनीतील पाण्याची पातळी खालावण्याचा धोका

  • नदीच्या पाण्याच्या नैसर्गिक शुद्धीकरणावर परिणाम

  • प्रदूषण वाढल्यास श्वसनाचे आजार, उष्णतेशी संबंधित विकार वाढणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT