नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवातील गर्दीनंतर शहरात स्वाइन फ्लू रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठवडाभरातच ५७ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूबाधितांची एकूण संख्या ३१८ वर पोहोचली आहे. सध्या ५२ रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
पावसाळा, हवामानातील बदल आणि सणासुदीच्या काळातील गर्दी यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. एच१एन१ विषाणूमुळे होणारा हा श्वसनाचा आजार असून, संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे त्याचा प्रसार होतो. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैपासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत गेली. जुलैमध्ये २१, तर ऑगस्टमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत ११४ रुग्ण आढळले होते. त्यानंतर गणेशोत्सव काळात आणखी ५७ रुग्णांची भर पडल्यामुळे सप्टेंबरमधील रुग्णसंख्या १७१ वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे.
सप्टेंबरमध्ये सहा जणांचा मृत्यू:
स्वाइन फ्लूमुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये महापालिका हद्दीतील तीन, ग्रामीण भागातील सहा, तसेच मालेगाव आणि सांगली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
डेंग्यूचे रुग्णही १६१ वर:
स्वाइन फ्लूबरोबरच शहरामध्ये डेंग्यू रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये ४५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सप्टेंबरच्या चार आठवड्यांमध्ये आणखी ६० जणांना डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे यंदा डेंग्यूबाधितांची एकूण संख्या १६१ वर पोहोचली आहे. डेंग्यूमुळे अद्याप एकही मृत्यूची नोंद नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.