नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने उघडीप घेताच, नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला असून, सप्टेंबरच्या उत्तरार्धातच 'ऑक्टोबर हीट'ची अनुभूती येण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा वाढलेला उकाडा, रात्रीच्या तुलनेने गारवा आणि हवेत कायम असलेली आर्द्रता यामुळे वातावरणातील बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
विशेषतः डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य जोखमीच्या रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नाशिकमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच स्वाइन फ्लूचा संसर्ग वेगाने वाढल्याचे आकडे समोर आले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या ११ दिवसांमध्ये ८४ नवीन स्वाइन फ्लू बाधित आढळले होते. सध्या ही संख्या २३१ वर पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.
महापालिकेच्या घरोघरी सर्वेक्षणात तब्बल ५९० घरांमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूला कारणीभूत डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. दरम्यान, स्वाइन फ्लू, डेंग्यू या जीवघेण्या आजारांबरोबरच हवामानातील अचानक बदलामुळे साथीचे आजारही बळावले आहेत. विशेषतः लहान मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे.
ताप, खोकला, सर्दी, उलट्या, जुलाब, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे मुलांमध्ये वाढत आहेत. याशिवाय, बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी आणि श्वसनाशी संबंधित तक्रारीदेखील वाढल्या आहेत.
"वातावरणातील बदलाचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावर होत असून, पालकांनी काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे. ताप, अंगदुखी वा अन्य लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."- डॉ. प्रशांत कुटे, बालरोग तज्ज्ञ
मुलांना पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ द्यावेत.
शक्यतो स्वच्छ किंवा उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
ताप, खोकला किंवा अन्य लक्षणे असल्यास, मुलाला शाळेत किंवा गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये.
घराभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
डासांपासून संरक्षणासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.
झोपताना डास प्रतिबंधक साधनांचा योग्य वापर करावा.
ताप, श्वसनाचा त्रास, सतत उलट्या किंवा मुलाची प्रकृति खालावत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गणेशोत्सव काळात बाजारपेठा, सार्वजनिक मंडळे आणि विविध ठिकाणी गर्दी वाढल्याने संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणाचे आव्हान वाढले आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाकडून डास नियंत्रण, धूरफवारणी, पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तपासणी आणि नागरिकांमध्ये जनजागृती यावर भर देणे आवश्यक आहे. 'आजार झाल्यानंतर उपचार' करण्यापेक्षा 'आजार होऊ नये' यासाठी घरापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
मुलांना ताप किंवा खोकला झाल्यानंतर पालकांकडून स्वतःहून औषधे देण्याचे प्रमाण आढळते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविचे (अँटीबायोटिक्स) किंवा अन्य औषधे देणे टाळावे. विशेषतः तापाचे कारण न समजता, औषधोपचार करण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित ठरते.
पावसाच्या विश्रांतीनंतर सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत असल्यामुळे दिवसा उष्णता वाढत आहे. त्याच वेळी हवेत आर्द्रता कायम असल्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या नाशिक केंद्राच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १९) कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदले, तर दि. २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शनिवारी सकाळी सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के होती.