नाशिक : शालेय साहित्य खरेदीसाठी पाल्यांसह पालकांनी गर्दी केल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी (दि. १५) चैतन्य दिसून आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खरेदीचा उत्साह दिसून आला, तर यंदा सरकारी पुस्तकाच्या किमतीत २० टक्के वाढ झाल्याने पालकांना अधिक खिसा मोकळा करावा लागला.
उन्हाळ्याच्या सुटीनंतर सोमवार (दि. १६)पासून नूतन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी आलेला रविवार (दि. १५) खरेदीचा 'सुपर संडे' ठरला. मेन रोड शालिमार, एम. जी. रोड तसेच अशोक स्तंभ ते रविवार कारंजा परिसरातील दुकानांमध्ये मुलांसह पालकांनी गर्दी केली. वॉटरबॅग, गणवेशाचे काळे आणि कवायतीसाठीचे पांढरे बूट तसेच दफ्तर आदी साहित्य घेण्यासाठी मुलांचा उत्साह दिसून आला. पावसाची शक्यता लक्षात घेत पालकवर्गाने सकाळसत्राला प्राधान्य दिले. मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी उतरल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अनेक शाळांमधून पालकांना शालेय साहित्य खरेदीची सक्ती केली जात असली तरी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पालकांना बाजारपेठेतच जावे लागते. पुस्तकांचे दर वगळता यंदा वह्यांच्या किमतीत मोठी वाढ न झाल्याने पालकांना यावेळी दिलासा मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, सायंकाळी आलेल्या पावसाने बाजारपेठेत नाशिककरांची तारांबळ उडाली तरीही उघडीप मिळताच ग्राहकांनी खरेदीसाठी उत्साह दाखवला.
स्टेशनरी साहित्यांच्या किमतीत यंदा दरवाढ झाली नाही. वॉटरबॅग, दफ्तर यांच्या किमतीत वाढ झाली परंतु त्यामध्येही भरपूर श्रेणी उपलब्ध असल्याने ग्राहकांना क्रयशक्तीनुसार पर्याय उपलब्ध आहेत. काही कंपन्यांच्या वह्यांच्या किमती यंदा गतवर्षीपेक्षा काही टक्क्यांनी कमी झाल्या.वेदांत हाके, स्टेशनरी विक्रेता, नवीन तांबट लेन, नाशिक
कंपास पेटी - ५० ते ३५० रु.
दफ्तर (बॅग) - १५० ते १५०० रु.
वॉटरबॅग - १०० ते ३५० रु.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तकात २० टक्के वाढ झाली. स्कूल-कॉलेजमधील शालेय साहित्य केंद्रापेक्षा बाजारपेठेतील दुकानांमध्ये वह्यांच्या किमती स्वस्त आहेत. पुढील दीड ते दोन महिने ग्राहकी चांगली होणार आहे.संजय हाके, शालेय साहित्याचे व्यावसायिक, रविवार कारंजा, नाशिक