येवला, पुढारी वृत्तसेवाः हरीण आणि काळवीट यांचे अभयारण्य असलेल्या येवला तालुक्यातील ममदापूर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये सहा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. शेतात एकटा सापडलेल्या या बालकाच्या शरीराची अक्षरशः लचके या भटक्या कुत्र्यांनी ओढून त्यास ठार केले.
ममदापूर येथील लमान तांडा वस्तीवर राहणाऱ्या राठोड कुटुंबीयातील श्याम ममराज राठोड वय वर्ष सहा हा दुपारी शेतात खेळत असताना त्याला भटक्या कुत्र्यांनी घेरून ठार केले. ही घटना संध्याकाळच्या वेळेस सदर बालक सापडत नसल्याने कुटुंबीयांनी आसपास सगळीकडे मित्रांकडे शोध घेणे सुरू केले आसपासच्या विहिरी व वस्त्या बघितल्या असता त्यांना एका गावाची सोंगणी झालेल्या शेतामध्ये सदर बालकाचा मृतदेह आढळून आला. या भागात अनेक पोल्ट्री व्यावसायिक असल्याने मृत झालेल्या कोंबड्या बाहेर विल्हेवाट करीत असल्याने मोकाट कुत्र्यांना हे सोपे खाद्य मिळाले आहे.