देवळा : तालुक्यातील विंचूर–प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील कापशी–भावडे फाट्यावर शनिवारी (दि. 27) सकाळी सुमारे 9 वाजता भरधाव एसटी बसच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निंबा केदा भदाणे (वय 67, रा. कापशी) हे कापशी–भावडे फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभे असताना नाशिकहून देवळ्याकडे जाणाऱ्या नाशिक–नंदुरबार एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, भदाणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालक सुनील सजन शिंदे (पंचवटी आगार) यांच्याविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मृताच्या कुटुंबीयांना 10 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच अपघात दावा मंजूर झाल्यानंतर 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
विंचूर–प्रकाशा मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग 752G चे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाल्यानंतर कापशी–भावडे चौफुली तसेच भावडबारी घाटाचा तीव्र उतार यामुळे हा परिसर अपघातप्रवण ठरत आहे. येथे गतीरोधक, इशारा फलक आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मयत निंबा भदाणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप सोनवणे व खैरणार करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता याच परिसरातील भावडे फाट्याजवळील वळणावर आणखी एका एसटी बसचा अपघात झाला. शहापूर आगाराची बस (MH 20 BL 3192) नाशिकहून साक्रीकडे जात असताना महामार्गावरील एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे नुकसान झाले आहे. एकाच दिवशी याच महामार्गावर एसटी बसचे दोन अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.