SIR process 
नाशिक

SIR Campaign Nashik | 'एसआरआर' अभियानात जिल्ह्यात दिंडोरी अव्वल

SIR Campaign Nashik | जिल्ह्याचे ८३.४७ टक्के काम पूर्ण; त्रुटी दूर करण्याचे काम प्राधान्याने

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआरआर) अभियानाला नाशिक जिल्ह्यात वेग आला असून, मतदारयादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी देऊन मदारारांची माहिती पडताळून पाहत असून, नवीन पात्र मतदारांचा समावेश, मृत वा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नोंद अद्ययावत करणे तसेच मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.


बुधवारी (दि. ५) सकाळी ६ पर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४२ लाख ६० हजार ८३९ मतदारांचे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्याची एकूण प्रगती ८३.४७ टक्के झाली आहे. उर्वरित कामही विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहे.

अभियानात दिंडोरी (अ. ज.) विधानसभा मतदारसंघाने ९८.६० टक्के प्रगतीसह जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. त्यापाठोपाठ निफाड (९६.७० टक्के), इगतपुरी (अ.ज.), (९५.७१ टक्के), बागलाण (अ.ज.), (९३.८५ टक्के), कळवण (अ.ज.), (९३.२३ टक्के), येवला (९२.७९ टक्के) आणि नांदगाव (९२.२३ टक्के) या मतदारसंघांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे.


चांदवड आणि सिन्नर या मतदारसंघांमध्येही ८८ टक्क्यांहुन अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित सर्व मतदारसंघांत अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी अभियानाचा नियमित आढावा घेत संबंधित उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"मतदारयादीची अचूकता ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रशासनाकडून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे."
- आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)बैठकीतील निर्देश
  • आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याचे नाव मतदारयादीत आहे का, याची खात्री करावी.

  • मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीला आल्यानंतर त्यांना आवश्यक सहकार्य करावे.

  • आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून मतदारयादी अद्ययावत करण्याच्या या महत्त्वपूर्ण अभियानात सहभागी व्हावे.

  • लोकशाही अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT