नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक नियोजनासाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे.
स्मार्ट पार्किंग प्रकल्पासाठी तिसऱ्यांदा राबविण्यात आलेल्या फेरनिविदा प्रक्रियेतील पाचही ठेकेदार कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्याने चौथ्यांना फेरनिविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
शहरातील वाहनतळाअभावी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिकेने नाशिक पूर्व व पश्चिम विभागात प्रायोगिकतत्त्वावर सहा चौरस किलोमीटरमधील २२ ऑनस्ट्रीट व सहा ऑफस्ट्रीट असे २८ स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १०० ते १५० मीटर अंतरावर नो पार्किंग व पार्किंगचे स्पॉट विकसित केले जाणार आहेत.
त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठीचे पार्किंग दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी १० ते ६० रुपये, तर चारचाकी वाहनाकरिता २० ते १०० रुपयांपर्यंत ताशी दर आकारले जाणार आहेत.
यापूर्वी दोन वेळा ही निविदा काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र, महापालिकेला दरमहा उत्पन्न देण्याच्या अटीवर ठेकेदारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर निविदेच्या अटी-शर्तीत स्थानिक ठेकेदारांसाठी बदल करण्यात आला.
त्यामुळे प्रशासनाने पार्किंगची निविदा रद्द करीत तिसऱ्यांदा फेरनिविदा काढली. त्यात रॉयल्टीची रक्कम ३५ लाखांवरून २० लाखांवर आणण्यात आली. त्यामुळे एकूण पाच ठेकेदार कंपन्यांनी काम करण्याची तयारी दर्शविली. मात्र, तांत्रिक तपासणीत या पाचही ठेकेदार कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता चौथ्यांदा फेरनिविदा काढली जाणार आहे.
स्मार्ट पार्किंगचे सहा चौरस किमीचे क्षेत्र
अशोकस्तंभ ते मुंबई नाका
अशोकस्तंभ ते आनंदवली
सिटी सेंटर मॉल ते महात्मानगर
महात्मानगर ते जेहान सर्कल
शरणपूर रोड, त्र्यंबक रोड, कॉलेज रोड शरणपूर रोड ते गंगापूर नाका सिग्नल
4,155 वाहन पार्किंगची व्यवस्था
महापालिकेच्या माध्यमातून 28 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट पार्किंगमध्ये 4,155 वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था असणार आहे. अधिकृत रिक्षा थांबा वगळता अन्य ठिकाणांहून वाहन टोइंग करण्याची मुभा ठेकेदाराला असणार आहे. दंड वसुलीदेखील ऑनलाइन केली जाणार आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून महापालिका आणि पोलिस विभागाला रॉयल्टी मिळणार आहे. टोइंगसाठी कमीत कमी ७०० आणि जास्तीत जास्त 1,150 रुपये आकारले जाणार आहेत.
स्मार्ट पार्किंगच्या निविदेत पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला असला, तरी पाचही ठेकेदार तांत्रिक तपासणीत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे स्मार्ट पार्किंग प्रकल्पासाठी फेरनिविदा काढली जाणार आहे.- प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका