नाशिक : 'एसआयआर' प्रक्रियेंतर्गत जाहीर झालेल्या प्रारूप मतदारयादी संदर्भात बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांचे पदाधिकारी. 
नाशिक

Nashik- नावे वगळलेल्या, संशयास्पद मतदारांची यादी जाहीर करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वपक्षीय बैठकीत मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीतील संशयास्पद मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी. तसेच नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या मतदारांची माहिती राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेससह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बसपा, मनसे, आप, सीपीएम, सीपीआय आदी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

एसआयआर प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. १) राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एसआयआर प्रक्रियेबाबत विविध आक्षेप आणि मागण्या मांडण्यात आल्या. प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएलओ प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचा आक्षेप नोंदविला.

त्याचप्रमाणे एसआयआर प्रक्रियेनंतरही पूर्वीप्रमाणेच अर्धवट पत्ते असलेली मतदारांची यादी तयार झाल्याचे नमूद करताना हरकती व आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेत काही दुबार नावेही पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने अशा मतदारांची विभागणी व ओळख करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

काही ठिकाणी पूर्वीप्रमाणेच अपूर्ण अथवा पुरेसा पत्ता नसलेल्या नोंदी आहेत. मात्र, अशा मतदारांच्या नावांसमोर कोणतीही स्वतंत्र खूण अथवा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेमकी कोणती नावे पडताळणीच्या कक्षेत आहेत, याबाबत मतदार आणि राजकीय पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा संशयास्पद किंवा पडताळणी आवश्यक असलेल्या मतदारांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले जाणार आहे. त्यामुळे अशा सर्व मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करून ती राजकीय पक्षांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच नोटीस बजावण्यापासून सुनावणीपर्यंतची संपूर्ण कार्यपद्धती स्पष्टपणे जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात सुमारे १० लाख २७ हजार मतदार सापडले नाहीत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचे दाखविण्यात आले आहे. याच पद्धतीने बीएलओंकडून पुढील पडताळणी केल्यास मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या बैठकीस सुनील केदार, नीलेश खैरे, ज्ञानेश्वर काळे, स्वाती जाधव, प्रेरणा बलकवडे, मयूर परदेशी, नीलेश साळुंखे, वैभव ठाकरे, दिनेश सातभाई, विद्या टिक्कल, मोहन जाधव, संजय पवार, सय्यद अजिम, शैलेंद्र सिंह, अॅड. प्रभाकर वायचळे, शेख रफिउद्दीन गुलाम मुस्तफा, प्रकाश चकोर, सुजित सोनवणे, अतुल सोनवणे, पंकज ठाकरे आदी विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT