नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना विलंब होत असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, कामांच्या दिरंगाईवरून नोटिसा बजावणाऱ्या प्रशासनानेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ठेकेदारांची बैठक बोलावल्याने या बैठकीच्या उद्देशाबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने २९ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यावेळी डांबराचा दर प्रतिमेट्रिक टन ४५ हजार रुपये होता. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे डांबराच्या दरात मोठी वाढ झाली असून, सध्या हा दर ८२ ते ८५ हजार रुपये प्रतिमेट्रिक टनापर्यंत पोहोचला आहे.
परिणामी, रस्त्यांची कामे करताना ठेकेदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डांबराच्या दरातील वाढीपोटी स्टार रेटनुसार फरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अद्याप वाढीव रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे वाढीव दराने काम करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांकडून कामांचा वेग कमी करण्यात आल्याचे चित्र आहे.
कामांच्या संथगतीची दखल घेत बांधकाम विभागाने त्र्यंबक रोड, त्र्यंबक नाका ते मुंबई नाका आणि महात्मा नगर येथील रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना उत्तरे देण्याची तयारी ठेकेदारांकडून सुरू असतानाच मंगळवारी (ता. २४) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ठेकेदारांची बैठक घेण्यात आली. स्थायी समितीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत रस्त्यांच्या कामांशी संबंधित तांत्रिक बाबींचा आणि प्रगतीचा अहवाल घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, नोटिसा बजावल्यानंतर लगेचच सुट्टीच्या दिवशी बैठक घेण्याची प्रशासनाला गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बैठकीचा उद्देश केवळ कामांचा आढावा घेणे हाच होता की, त्यामागे अन्य काही कारण होते, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ठेकेदारांची बैठक आयोजित करण्यासाठी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकारही चर्चेचा विषय ठरला आहे.