Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कामांच्या निविदा आता प्राधिकरणामार्फत

Nashik Simhastha Kumbh Mela | महापालिकेच्या कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांच्या निविदा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांच्या निविदा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आगामी सिंहस्थासाठीची विविध विकासकामे आणि सेवा यासंदर्भातील निविदा प्रक्रिया आता थेट नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे महापालिकेची भूमिका मुख्यतः कामांच्या अंमलबजावणीपुरती मर्यादा असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्याशी संबंधित विविध पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा आदींसाठी आवश्यक निविदा प्राधिकरणामार्फत प्रसिद्ध केल्या जातील. शहरातील कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाशिक महापालिका करणार असून, ग्रामीण भागातील कामे संबंधित विभागीय यंत्रणांकडे सोपविण्यात येणार आहेत.

त्यामुळे नियोजन, निविदा प्रक्रिया आणि कंत्राटी अधिकार प्राधिकरणाकडे, तर प्रत्यक्ष कामांची जबाबदारी संबंधित यंत्रणांकडे राहणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर टीका होत आहे.

शहरातील रस्त्यांची एकाच वेळी करण्यात आलेली खुदाई, खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, नव्याने तयार झालेल्या रस्त्यांवर पडलेल्या भेगा तसेच स्टार रेटच्या आधारे ठेकेदारांना कामे देण्याच्या कथित प्रयत्नांमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या कामांची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून काढून घेऊन ती प्राधिकरणाकडे सोपविण्याचा निर्णय झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

नव्या वादाला तोंड?

या निर्णयामुळे प्रशासनातील अधिकारवाटपाचा नवा अध्याय सुरू झाला असून, आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत वाढ होणार की नव्या वादांना तोंड फुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT